वॉशिंग्टन,
A shadow of terror on Halloween अमेरिकेत हॅलोविन वीकेंड हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यंदा या आनंदोत्सवावर दहशतीचे काळे सावट आले होते. हॅलोविनच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी कट रचला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने तात्काळ पावले उचलत मिशिगन राज्यात मोठी कारवाई केली आणि अनेक संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला टळल्याची अधिकृत पुष्टी एफबीआय संचालक काश पटेल यांनी केली आहे.
पटेल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत सांगितले की, एफबीआयच्या तातडीच्या आणि समन्वयित कारवाईमुळे मिशिगनमध्ये नियोजित दहशतवादी कट उधळून लावण्यात यश आले आहे. आमच्या एजंट्सच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक भागीदार संस्थांच्या मदतीमुळे एका गंभीर हिंसक हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले,असे त्यांनी म्हटले.
या ऑपरेशनविषयी संपूर्ण तपशील अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहेत. एफबीआयने मिशिगनच्या कोणत्या भागात ही कारवाई झाली याची स्पष्ट माहिती दिलेली नाही, मात्र स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, डेट्रॉईटजवळील डिअरबॉर्न आणि इंकस्टर या उपनगरांमध्ये एफबीआय एजंट सक्रिय होते. डिअरबॉर्न हे फोर्ड मोटर कंपनीचे मुख्यालय असलेले शहर असून, येथे अरब-अमेरिकन लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
शुक्रवारी डिअरबॉर्न पोलिसांनीही आपल्या सोशल मीडिया पेजवर माहिती देताना एफबीआय एजंट्स त्यांच्या परिसरात कार्यरत असल्याचे नमूद केले होते. तथापि, हे ऑपरेशन दहशतवादी कटाशी संबंधित होते की इतर कोणत्यातरी तपासाशी, याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही. दरम्यान, अल जझिरा आणि डेट्रॉईट फ्री प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, एफबीआयने हॅलोविनच्या काळात होऊ शकणारा हिंसक हल्ला रोखण्यात यश मिळवले आहे आणि या कारवाईनंतर मिशिगन राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एफबीआय लवकरच अटकेत असलेल्या संशयितांविषयी अधिकृत माहिती जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.