पाकिस्तानला दुसरे युद्ध परवडणारे नाही!

01 Nov 2025 12:26:40
नवी दिल्ली,
Advice from Fazlur Rahman पाकिस्तानमधील जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ) चे प्रमुख आणि प्रभावशाली पश्तून धर्मगुरू मौलाना फजलुर रहमान यांनी पुन्हा एकदा देशाच्या लष्करावर तीव्र टीका करत, त्याच्या धोरणांवर सवाल उपस्थित केला आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, पाकिस्तानला आता आणखी एक युद्ध परवडणारे नाही आणि लष्कराने आपली बेपर्वा धोरणे बदलण्याची वेळ आली आहे.
 
Advice from Fazlur Rahman
 
मौलाना रहमान म्हणाले की, १९७१ मधील बांगलादेश युद्ध आणि १९९९ चा कारगिल संघर्ष हे लष्कराच्या चुकीच्या निर्णयांचे उदाहरण आहे. माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या काळात झालेल्या या घटनांमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात आली आणि देश आर्थिक तसेच राजकीय दृष्ट्या मागे राहिला. त्यांनी सध्याचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या अफगाणिस्तानविषयीच्या आक्रमक भूमिकेवरही अप्रत्यक्ष टीका केली.
त्यांच्या मते, देशाच्या सीमेपलीकडे लढण्याऐवजी पाकिस्तानी लष्कराने आपल्या घरातील संकटांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आर्थिक घसरण, दहशतवाद, बेरोजगारी आणि खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील प्रशासनातील गोंधळ हीच खरी युद्धभूमी आहे. सीमेवर तोफांच्या गोळ्यांनी नाही तर विकासाच्या धोरणांनी लढायला हवे,असे ते म्हणाले. मौलाना फजलुर रहमान यांनी इस्लामी दृष्टिकोनातूनही लष्कराला सुनावले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की इस्लाम शेजारी मुस्लिम देशावर अन्याय्य युद्ध किंवा आक्रमण करण्यास कधीच परवानगी देत नाही. अफगाणिस्तानाशी संघर्ष उभा करणे हे ना धार्मिकदृष्ट्या योग्य आहे, ना राजकीय दृष्ट्या शहाणपणाचे, असे ते म्हणाले.
विश्लेषकांच्या मते, रहमान यांचे हे वक्तव्य पाकिस्तानमधील युद्धविरोधी विचारसरणीला बळकटी देऊ शकते आणि भारतासह प्रादेशिक शांतीसाठी उपयुक्त ठरू शकते. काही भारतीय गुप्तचर सूत्रांच्या मते, त्यांच्या या भूमिकेने अफगाण तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे संकेत मिळतात. दरम्यान, मौलाना रहमान यांनी भारताशी संवाद साधण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. त्यांच्या निकटवर्तीय खासदार कामरान मुर्तझा यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सांगितले की, मौलाना रहमान भारतात येऊन शांततेचा संदेश देऊ इच्छितात. त्यांनी सांगितले की, मौलाना साहेबांचा शांतीचा संदेश मी स्वतः भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात पुन्हा एकदा लष्कराच्या भूमिकेविषयी तीव्र चर्चा सुरू झाली आहे. मौलाना रहमान यांचे विधान हे केवळ धार्मिक नाही तर राजकीय दृष्टीनेही मोठे महत्त्वाचे मानले जात आहे.
Powered By Sangraha 9.0