नवी दिल्ली,
Babar breaks Rohit's world record लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी दणदणीत पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने इतिहास रचला. फक्त ११ नाबाद धावा करताना त्याने रोहित शर्माचा जागतिक विक्रम मोडला आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
संग्रहित फोटो
सामन्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या निराशाजनक फलंदाजीने झाली. पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या ११० धावांवर गारद झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना एकही श्वास घ्यायला दिला नाही. फहीम अशरफने चार, सलमान मिर्झाने तीन, तर नसीम शाहने दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेची कंबर मोडली. आफ्रिकेचा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळला. क्विंटन डी कॉक ७ धावा, रीझा हेंड्रिक्स शून्यावर, टोनी डी झोर्झी ७ आणि मॅथ्यू ब्रीट्झके फक्त ५ धावांवर बाद झाले. कर्णधार डोनोव्हल फरेरालाही फक्त १५ धावा करता आल्या.
लहान लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने आत्मविश्वासाने खेळ सुरू केला. साहिबजादा फरहान आणि सॅम अयुब यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. फरहान २८ धावांवर बाद झाला, त्यानंतर कर्णधार बाबर आझम मैदानात उतरला. दुसऱ्या टोकावर असलेल्या सॅम अयुबने मात्र जबरदस्त फटकेबाजी करत ३८ चेंडूत ७१ नाबाद धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. बाबर आझमने शांत पण स्थिर खेळी करत १८ चेंडूत ११ नाबाद धावा केल्या आणि संघाला १४व्या षटकातच सहज विजय मिळवून दिला.
या छोट्याशा डावातही बाबर आझमने मोठा पराक्रम साध्य केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले. रोहितने ४२३१ धावा केल्या होत्या, तर बाबरने आता १३० सामन्यांत ४२३४ धावांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत बाबर अव्वल, त्याच्या मागे रोहित शर्मा (४२३१), विराट कोहली (४१८८), इंग्लंडचा जोस बटलर (३८६९) आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (३७१०) यांचा समावेश आहे.