जेद्दाह,
Indian youth killed in Jeddah सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झारखंडमधील २७ वर्षीय भारतीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिस आणि दारू तस्करांमध्ये झालेल्या चकमकीत त्याला गोळी लागून तो ठार झाला. मृत तरुणाचे नाव विजय कुमार महातो असून तो झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील डुमरी तालुक्यातील दुधपानिया गावचा रहिवासी होता. विजय गेल्या नऊ महिन्यांपासून जेद्दाहमध्ये एका खाजगी कंपनीत टॉवर लाईन फिटर म्हणून काम करत होता.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी जेद्दाहमध्ये ही चकमक झाली. सुरुवातीला विजय जखमी झाला असून उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र, नंतर समजले की विजयचा मृत्यू गोळीबारातच झाला आहे. स्थलांतरित भारतीय कामगारांच्या हक्कांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सिकंदर अली यांनी सांगितले की, विजयने गोळीबाराच्या वेळी आपल्या पत्नी बसंती देवीला व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. मी गोळीबारात अडकलो आहे आणि मला गोळी लागली आहे.
हा संदेश मिळाल्यानंतर पत्नीने आपल्या सासरच्यांना माहिती दिली, मात्र सर्वांना वाटले की विजयला किरकोळ दुखापत झाली आहे आणि तो रुग्णालयात उपचार घेत आहे. अखेर २४ ऑक्टोबर रोजी कंपनीकडून कुटुंबाला कळविण्यात आले की विजयचा मृत्यू झाला आहे. सिकंदर अली यांच्या माहितीनुसार, जेद्दाह पोलिस आणि अवैध दारू व्यापारात गुंतलेल्या टोळीमध्ये चकमक झाली आणि त्यात विजय महातो अडकला. तो त्या भागातून जात असताना गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येतो.
झारखंड राज्य कामगार विभागाने या घटनेची दखल घेतली असून, सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मृतदेह भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थलांतर नियंत्रण कक्षाच्या टीम लीडर शिखा लाक्रा यांनी पुष्टी केली की, विभागाला मृत्यूची माहिती मिळाली असून, औपचारिक विनंती आल्यानंतर दूतावासाच्या मदतीने मृतदेह घरी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते अली यांनी सांगितले की, त्यांनी राज्य कामगार विभाग आणि गिरिडीह जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे विजयच्या गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.