नवी दिल्ली,
Its not freezing cold नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशभरात थंडीच्या आगमनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सोशल मीडियावर यंदा तीव्र थंडी पडणार अशा अफवा पसरत असताना, भारतीय हवामान खात्याने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. हवामान विभागाने सांगितले की, यंदा भारतात मध्यम स्वरूपाचा हिवाळा असेल, तीव्र थंडी पडण्याची शक्यता नाही. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले की, मागील काही वर्षांच्या तुलनेत या वेळी हिवाळ्याचे स्वरूप सौम्य राहील. दिवसाचे तापमान किंचित घटेल, तर रात्रीचे तापमान तुलनेने थोडे जास्त राहील. म्हणजेच दिवसा गारवा जाणवेल, पण रात्री फारशी कडाक्याची थंडी पडणार नाही.
अलीकडे भारतावर दुहेरी चक्रीवादळाचे संकट ओढवले होते, त्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडला. या वातावरणातील बदलामुळे लोकांमध्ये तीव्र थंडीबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु हवामान विभागाने स्पष्ट केले की, ‘ला निना’ आणि ‘इंडियन ओशन डायपोल’ ही दोन्ही हवामान प्रणाली सामान्य स्थितीत परतल्याने थंडी मध्यम राहील.
डॉ. महापात्रा म्हणाले, येत्या काही दिवसांत थंडीची सुरुवात होईल, मात्र ती सौम्य असेल. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत उत्तर भारतात थंडी तीव्रतेने जाणवते, पण यावेळी ती फारशी कडक राहणार नाही. सध्या जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या भागांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे, तरीही यंदा देशभरात थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘तीव्र हिवाळा’बाबतच्या अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि अधिकृत अंदाजावरच विश्वास ठेवावा.