“जेडी वेंस माझ्या नवऱ्यासारखे आहेत”- एरिका किर्कच्या वक्तव्याने पेटला वाद!VIDEO

01 Nov 2025 17:47:54
वाशिंग्टन,
JD Vance-Erica Kirk-Controversy : अमेरिकेतील माजी दक्षिणपंथी कार्यकर्ते आणि टर्निंग पॉइंट यूएसए (TPUSA) चे संस्थापक चार्ली किर्क यांच्या हत्येला दोन महिने उलटले असतानाच, त्यांच्या पत्नी एरिका किर्क यांनी केलेल्या विधानामुळे अमेरिकन राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
 
JD Vance-Erica Kirk-Controversy
 
 
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एरिका म्हणाल्या, “कोणीही माझ्या पतीची जागा घेऊ शकत नाही, परंतु जेडी वेंस यांच्यात मला माझ्या पतीच्या काही गुणांची झलक दिसते.” हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर अमेरिकन राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
 
चार्ली किर्क हे टीपीयूएसएचे संस्थापक होते. 10 सप्टेंबर 2025 रोजी युटा व्हॅली विद्यापीठात भाषणादरम्यान त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनाचा आरोप 22 वर्षीय टायलर रॉबिन्सन याच्यावर ठेवण्यात आला असून, एफबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चार्लीच्या मृत्यूनं अमेरिकन रूढीवादी चळवळीला जबर धक्का बसला, पण एरिका किर्क यांनी त्यांच्या अपूर्ण मिशनला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
 
 
 
 
अलीकडे मिसिसिपी येथील विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात एरिका यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमातील दोघांच्या गले मिळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तो क्षण बऱ्याच लोकांना “रोमँटिक” वाटल्याने सोशल मीडियावर यावरून तीव्र चर्चा सुरू आहे.
 
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत एरिका किर्क म्हणाल्या, “मी घाबरणारी नाही. चार्लीच्या वारशासाठी मी लढत राहीन. जेडी वेंस हे अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. ते माझ्या पतीप्रमाणे तरुण रूढीवाद्यांना प्रेरणा देतात.” त्यावर वेंस यांनीही प्रतिक्रिया देत सांगितले, “चार्लीचं समर्पण आणि आवेग आम्हा सर्वांना बळ देतं.”
 
दरम्यान, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा जेडी वेंस यांचं एका वेगळ्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर आधीच वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात आपली पत्नी उषा यांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, असं विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर अमेरिकन माध्यमं आणि सोशल मीडिया दोन्ही ठिकाणी त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती.
 
 
 
 
आता एरिका किर्क यांनी जेडी वेंस यांचं सार्वजनिक कौतुक करत “माझ्या पतीसारखे” म्हटल्याने आणि त्यांची गळाभेट मिळण्याचं व्हिडिओ समोर आल्यानंतर अमेरिकन राजकारणात पुन्हा नवा वाद पेटला आहे. काहींनी हे समर्थनाचं प्रतीक मानलं, तर काहींनी याला “अनुचित जवळीक” म्हणून टीका केली आहे.
 
अजूनही या घडामोडीवर उषा वेंस यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु अमेरिकन सोशल मीडियावर हा विषय प्रचंड चर्चेत आहे.
Powered By Sangraha 9.0