पुणे,
Maharashtra 10th-12th exams महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाचे औपचारिक जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेले हे वेळापत्रक अखेर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत पार पडणार आहे.
दरवर्षीप्रमाणे या परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येतील. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण मंडळांचा समावेश आहे. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेळापत्रक
https://www.mahahsscboard.in/mr या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. मात्र हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून देण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाणार आहे, असे मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणारे किंवा अन्य संकेतस्थळांवर दिसणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, कारण त्यात चुकीच्या तारखांची शक्यता असते. दरम्यान, बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान, तर दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत पार पडतील.
राज्य मंडळाने सांगितले आहे की, विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून योग्य तारखा तपासाव्यात आणि परीक्षेचे नियोजन वेळेत करावे. यावर्षीच्या परीक्षा अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्या जाणार असून, परीक्षेचे हॉल तिकीट, केंद्र व सर्व सूचना नियोजित वेळेत देण्यात येतील. शिक्षण क्षेत्रातील ही मोठी घोषणा होताच विद्यार्थ्यांमध्ये तयारीचा उत्साह दुणावला आहे. परीक्षेचा काळ आता जवळ आल्याने राज्यभरात शाळा व महाविद्यालयांमध्ये पुनरावलोकन, प्रश्नसंच सराव आणि मार्गदर्शन वर्गांना वेग आला आहे.