तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Eshwar Rathod protest तालुक्यातील शेलोडी ग्रामपंचायतीच्या विकासकामातील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत ग्रामपंचायतीचे दस्तऐवज उपलब्ध करून न देणाèया ग्रामसेवका विरोधात कारवाईसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर राठोड यांनी 30 जुलै रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती दारव्हा यांचेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
कारवाईस होणारा विलंब लक्षात घेऊन राठोड यांनी 16 सप्टेंबर रोजी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर गटविकास अधिकाèयांनी लेखी आश्वासन देत 23 सप्टेंबर रोजी चौकशी समिती शेलोडी ग्रामपंचायतीत येऊन चौकशी करून 30 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करेल, असे आश्वासन दिले होते.
मात्र 23 सप्टेंबर रोजी समितीने ग्रामपंचायतीला भेट दिली असली, तरी अनेक आवश्यक दस्तऐवज त्या वेळी उपलब्ध नव्हते. चौकशीसाठी काही विकासकामांचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले होते; तथापि, शेलोडी येथून बदली झालेल्या तत्कालीन ग्रामसेवकाने हे दस्तऐवज स्वतःकडेच ठेवले असल्याची माहिती पुढे आली आहे.परिणामी, आजतागायत चौकशी पूर्ण न होता अहवाल सादर झालेला नाही. विकासकामे न होताच बिलांची उचल झाल्याचे पुरावे समोर येत असून, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची शंका अधिक बळकट झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात पंचायत समिती दारव्हा प्रशासन दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते ईश्वर राठोड यांच्या कडून होत आहे. तक्रार, अन्नत्याग आंदोलन आणि माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध होऊनही जर कारवाई होत नसेल, तर प्रशासन दोषींना वाचवण्याचाच प्रयत्न करत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते ईश्वर राठोड यांनी जर 4 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करत दोषींवर कारवाई केली गेली नाही तर दि. 5 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात आत्मदहन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बाबतीत लेखी निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध माझे आत्मदहन : ईश्वर राठोड
तक्रार दाखल करुन चार महिने झाले तरी कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. अन्नत्याग आंदोलन केले, लेखी आश्वासन दिले मात्र तरी चौकशी व दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. यावरून स्पष्ट होते की पंचायत समिती प्रशासनाला शेलोडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराला व दोषींना पाठीशी घालायचे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अनास्थेला कंटाळून मी 5 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात आत्मदहन करण्याचा निर्धार केला आहे.