चीनचे ‘शेन्झोउ-२१’ अंतराळयान यशस्वी!

01 Nov 2025 14:49:04
जिउक्वान,
shenzhou-21-spacecraft चीनच्या अंतराळ संशोधन मोहिमेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. चार उंदीर आणि तीन अंतराळवीरांना घेऊन जाणारे ‘शेन्झोउ-२१’ हे अंतराळयान शनिवारी यशस्वीपणे अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. हे यान विक्रमी वेळेत अवकाश स्थानकावर पोहोचले असून, चीनसाठी ही मोहिम विज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चायना मॅनड स्पेस एजन्सी (सीएमएसए)च्या माहितीनुसार, शेन्झोउ-२१ ने शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार ११:४४ वाजता वायव्य चीनमधील जिउक्वान प्रक्षेपण केंद्रावरून झेप घेतली. सुमारे साडेतीन तासांत हे अंतराळयान अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. जे मागील मोहिमेपेक्षा तीन तासांनी जलद होते. आता हे तिन्ही अंतराळवीर स्थानकाच्या ‘तियान्हे कोर मॉड्यूल’ मध्ये प्रवेश करतील आणि पुढील सहा महिन्यांसाठी विविध वैज्ञानिक प्रयोग पार पाडतील.
 
 
shenzhou-21-spacecraft
 
या मोहिमेच्या क्रूचे नेतृत्व कमांडर आणि पायलट झांग लू करत आहेत, जे यापूर्वी शेन्झोउ-१५ मोहिमेचा भाग राहिले आहेत. त्यांच्या सोबत अभियंता वू फी (३२) आहेत, जे चीनचे सर्वात तरुण अंतराळवीर मानले जातात, तर तिसरे सदस्य झांग होंगझांग हे पेलोड तज्ञ असून ते प्रगत पदार्थ आणि नवऊर्जा संशोधनात तज्ज्ञ आहेत. या मोहिमेदरम्यान जैवतंत्रज्ञान, अवकाश औषध, पदार्थ विज्ञान आणि उपयोजित तंत्रज्ञानाशी संबंधित तब्बल २७ वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. मात्र या मोहिमेतील सर्वात वेगळी आणि चर्चेची बाब म्हणजेचीनने पहिल्यांदाच उंदीरांना अवकाशात पाठवले आहे. चार उंदीर (दोन नर आणि दोन मादी) यांच्या वर्तनावर अवकाशातील वजनहीनता आणि बंदिस्त वातावरणाचा कसा परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
 
 
चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसचे अभियंता हान पेई यांनी सांगितले की, या प्रयोगासाठी ३०० उंदरांपैकी ६० दिवसांच्या कठोर प्रशिक्षणानंतर केवळ चारच निवडण्यात आले आहेत. हे उंदीर अवकाश स्थानकात पाच ते सात दिवस राहतील आणि नंतर ‘शेन्झोउ-२०’ यानाद्वारे पृथ्वीवर परत आणले जातील. दरम्यान, चीनच्या अंतराळ संस्थेचे प्रवक्ते झांग जिंगबो यांनी सांगितले की, देश आता चंद्रावर मानव मोहिम पाठवण्यासाठी तयारी करत आहे. या प्रकल्पाच्या संशोधन आणि विकासाचे काम सध्या सुरळीत सुरू आहे. तसेच पाकिस्तानसोबतच्या सहकार्याचा भाग म्हणून दोन पाकिस्तानी अंतराळवीरांना चीनमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यापैकी एकाला लवकरच पेलोड तज्ञ म्हणून अल्पकालीन मोहिमेवर पाठवण्याची योजना आहे. या यशस्वी प्रक्षेपणाने चीनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो अवकाश संशोधन क्षेत्रात अमेरिके आणि रशियासारख्या देशांच्या बरोबरीने उभा आहे.
Powered By Sangraha 9.0