श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी ९ ठार...अनेकांच्या मृत्यूची भीती

01 Nov 2025 12:55:24
श्रीकाकुलम,
Stampede at Venkateswara temple in Srikakulam आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एकादशीनिमित्त मोठा अनर्थ घडल्याची माहिती समोर आली आहे. कासीबुग्गा येथील प्रसिद्ध वेंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी पहाटे भाविकांची मोठी गर्दी जमली होती. एकादशीच्या निमित्ताने सुरू असलेल्या विशेष पूजेदरम्यान अचानक चेंगराचेंगरीची घटना घडली, ज्यात नऊ भाविक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
Stampede at Venkateswara temple in Srikakulam
 
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दर्शन रांगा विस्कटल्याने आणि व्यवस्थापनात गोंधळ निर्माण झाल्याने अचानक धावाधाव सुरू झाली. काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि लोक एकमेकांच्या अंगावर पडले. चेंगराचेंगरीत काहींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त असून प्रशासनाने घटनास्थळी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथके दाखल झाली आहेत. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’वरून (माजी ट्विटर) पोस्ट करत लिहिले की, वेंकटेश्वर मंदिरात झालेली चेंगराचेंगरी अत्यंत वेदनादायक आहे.
 
 
 
 
मृतांच्या कुटुंबियांप्रती माझी सखोल संवेदना आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने बचावकार्य वाढविण्याचे आणि सर्व जखमींना त्वरित वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे. एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घडलेल्या या दुःखद प्रसंगाने संपूर्ण राज्य हादरले आहे.
Powered By Sangraha 9.0