मुंबई,
Women's ODI World Cup नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये उद्या म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा भव्य अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे, कारण दोघेही पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, या निर्णायक सामन्याच्या पार्श्वभूमीवर हवामानाने खेळ बिघडवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हलका पाऊस आणि आर्द्र वातावरण यामुळे सामना व्यत्यय येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चाहत्यांपासून ते संघ व्यवस्थापनापर्यंत सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे.
आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच, जर सामना नियोजित दिवशी पूर्ण झाला नाही, तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू होईल. तरीदेखील, आयसीसीचा प्राथमिक हेतू सामना त्याच दिवशी पूर्ण करण्याचा असतो, जरी षटकांची संख्या कमी करावी लागली तरी. पावसामुळे खेळ थांबला आणि काही षटके पूर्ण झाली, उदाहरणार्थ पहिल्या दिवसात प्रत्येक संघाने १९ किंवा २० षटके खेळली, आणि नंतर पावसामुळे खेळ थांबला, तर दुसऱ्या दिवशी सामना तिथूनच पुढे सुरू केला जाईल. मात्र, जर सामना अजून कमी झालेल्या षटकांच्या स्वरूपात अधिकृतपणे सुरूच झाला नसेल, तर राखीव दिवशी तो नवीन ५० षटकांच्या खेळाप्रमाणे पुन्हा सुरू केला जाईल.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर सामना आधीच कमी षटकांचा घोषित झाला असेल, तर राखीव दिवशी तो त्या स्वरूपातच पुढे सुरू राहील. परंतु, जर सामना अर्धवट राहिला आणि कमी षटकांचा निर्णय लागू झाला नसेल, तर राखीव दिवशी तो नवीन सामन्याप्रमाणे खेळवला जाईल. मुंबईत सध्या आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ७४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तापमान ३१ अंश सेल्सिअस असून वारे सुमारे १८ किमी प्रतितास वेगाने वाहत आहेत. हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि सामना व्यत्यय येण्याची ३० टक्के शक्यता व्यक्त केली आहे. जर पावसामुळे नियोजित दिवशी आणि राखीव दिवशी दोन्ही दिवशी सामना खेळवता आला नाही, तर आयसीसीच्या नियमानुसार भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विश्वविजेते घोषित केले जाईल. त्यामुळे, उद्याचा सामना केवळ क्रिकेटचा नाही, तर हवामानाशीही एक मोठा सामना ठरणार आहे. आता सर्वांची नजर आकाशाकडे आणि इतिहासाच्या नव्या पानावर आहे.