मुंबई,
Congress on its own in Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आणि ताज्या घडामोडी समोर आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात सोमवारी, १० नोव्हेंबर २०२५ रोजी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. वडेट्टीवार म्हणाले, आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवले आहे की, ही निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे कोणाला किती जागा मिळतील, याची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी विरोधकांना आव्हान देत म्हटले, आम्ही मुंबईत नेहमीच लढत आलो आहोत आणि ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. जर महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत असताना त्यांचे विभाजन होत नाही, तर आमच्या विभाजनाची चिंता का करायची?

वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आणि सहभागावर भर दिला. ते म्हणाले, निवडून येणे हे आमच्यासाठी दुय्यम आहे. जिंकणे हा उद्देश नाही, पण कार्यकर्त्यांना न्याय देणे आणि त्यांना निवडणूक लढण्याची संधी देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी यापुढे देखील स्पष्ट केले की, जर समविचारी पक्षांकडून एकत्र येण्याचा प्रस्ताव आला, तर त्यावर विचार केला जाईल. मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असली तरी, नाशिकमध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येऊन लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीचा पराभव करण्यासाठी एकत्रित आघाडी तयार होण्याची शक्यता आहे. यावरून स्पष्ट होते की, मुंबईत काँग्रेस स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत आहे, तर इतर शहरांमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या एकत्रित प्रयत्नांनी राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.