धक्कादायक...फरिदाबादमध्ये २,५०० किलो स्फोटकांचा साठा उघडकीस

10 Nov 2025 15:13:54
फरिदाबाद,
Explosives seized in Faridabad हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात पोलिसांनी स्फोटकांचा आणखी एक विनाशकारी साठा जप्त केला आहे. फतेहपूर टागा गावातून २,५६३ किलो संशयास्पद स्फोटके मिळाली असून त्याला वाहून नेण्यासाठी ट्रक बोलवावे लागले. प्राथमिक तपासात संशयास्पद स्फोटक अमोनियम नायट्रेट असल्याचे दिसून आले आहे. फरिदाबाद पोलिस आणि जम्मू-काश्मीर पोलिस सकाळपासूनच परिसरात छापे टाकत आहेत. यापूर्वी धौज परिसरात ३६० किलो स्फोटके सापडली होती.
 
 
Explosives seized in Faridabad
 
या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. आदिल अहमद राठर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांचा समावेश आहे. तपासात समोर आले आहे की, मुझम्मिलने धौज आणि फतेहपूर टागा गावात खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. हे घर एका मौलानाकडून भाड्याने घेण्यात आले होते, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे. फतेहपूर टागा गाव धौजपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे.
 
पूर्वीच्या तपासात धौजमधून ३६० किलो स्फोटके, २० टायमर, वॉकी-टॉकी आणि असॉल्ट रायफल्स जप्त करण्यात आल्या होत्या. ६ ऑक्टोबर रोजी सहारनपूरमध्ये अटक केलेल्या डॉ. आदिल अहमद यांच्या माहितीच्या आधारे मुझम्मिलला अटक करण्यात आली. या माहितीमुळेच संपूर्ण शहराला हादरवू शकणाऱ्या स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात डॉ. मुझम्मिल शिकवत होते, तर डॉ. आदिल अहमद अनंतनागमधील सरकारी रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्यानंतर आदिल सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आला. त्यानंतर या मोठ्या दहशतवादी कटाचे विविध दुवे जोडले जात आहेत.
Powered By Sangraha 9.0