हाफिज सईदचा नवा कट...बांगलादेशातून भारतावर हल्ल्याचा कट

10 Nov 2025 12:09:02
इस्लामाबाद,
Hafiz Saeed's new लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, सईद सध्या बांगलादेशला दहशतवादी कारवायांसाठी नवीन केंद्र म्हणून तयार करत आहे. भारतावर दहशतवादी हल्ले करण्यासाठी बांगलादेशाचा वापर “लाँचपॅड” म्हणून करण्याचा त्याचा डाव असल्याचे समोर आले आहे. ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामिवाली येथे झालेल्या एका सभेत या कटाचा उल्लेख करण्यात आला. या सभेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह बोलताना दिसतो. तो स्पष्टपणे सांगतो की. हाफिज सईद शांत बसलेला नाहीये; तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ल्याची तयारी करत आहे.
 
 
Hafiz Saeed
 
या कमांडरने हेही दावा केला की लष्कर-ए-तोयबा आधीच बांगलादेशात सक्रिय आहे आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. या घडामोडीमुळे भारताच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत.एका वृत्तानुसार, हाफिज सईदने आपल्या एका विश्वासू सहकाऱ्याला बांगलादेशात पाठवले आहे. त्याचे उद्दिष्ट स्थानिक तरुणांना कट्टरतावादी विचारांनी भुलवणे आणि त्यांना जिहादच्या नावाखाली दहशतवादी प्रशिक्षण देणे हे आहे.
 
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लष्करचा कमांडर सैफुल्लाह उघडपणे भारताविरुद्ध युद्ध छेडण्याचे आवाहन करताना दिसतो. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात लहान मुलांचाही सहभाग दिसून येतो. या दृश्यांवरून हे स्पष्ट होते की लष्कर-ए-तोयबा अल्पवयीन मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादाकडे वळवत आहे. या भाषणात सैफुल्लाहने पाकिस्तानी सैन्याचे कौतुक करत, ९-१० मेच्या घटनांनंतर पाकिस्तानच्या प्रतिक्रियेबद्दल अभिमान व्यक्त केला. त्याने दावा केला की अमेरिका आणि बांगलादेश आता पाकिस्तानच्या जवळ येत आहेत. तथापि, या व्हायरल व्हिडिओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. या नव्या उघडकीनंतर हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेच्या हालचालींवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. बांगलादेशातील वाढत्या दहशतवादी सक्रियतेमुळे भारताच्या पूर्व सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0