murder-of-a-mentally-ill-person मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या एका मनोरुग्णामुळे महिलांना होत असलेल्या त्रासाबरोबरच स्थानिक पोलीस पाटीलवरही विटांचे तुकडे फेकून मारल्याने संतप्त झालेल्या पोलीस पाटीलसह अन्य ५ जणांनी त्या मनोरुग्णास मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मनोरुग्णाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी केलेल्या चौकशी व शवविच्छेदनादरम्यान आढळलेल्या गंभीर जखमांच्या आधारावर पोलीस पाटीलसह अन्य ५ जणांविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास लाखांदुर तालुक्यातील विरली (खुर्द) गावात घडली.
या घटनेत विरली (खुर्द) येथील बुद्धीवान नंदाराम धनविजय (३५) या मनोरुग्णाच्या हत्येच्या आरोपाखाली त्याच गावातील पोलीस पाटील योगेश राऊत (४३) तसेच अजय मेश्राम (३०), सौरभ प्रधान (१९), रामेश्वर ठाकरे व लोकेश ठाकरे (२६) या आरोपींविरुद्ध लाखांदुर पोलिस ठाण्यात हत्या, अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) व इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. या आजारामुळे गावातील महिला व नागरिक त्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. murder-of-a-mentally-ill-person दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी पोलीस पाटील विरली (खुर्द) येथील एका पानटपरीवर बसलेले असताना त्या ठिकाणी मनोरुग्ण आला व त्यांच्याशी वाद घालून विटांचे तुकडे फेकून मारल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त पोलीस पाटीलने अन्य आरोपींसोबत संगनमत करून संधी साधून त्या मनोरुग्णाच्या पायांवर व शरीराच्या इतर भागांवर काठी व हातांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या मनोरुग्णास त्याच्या घराच्या परिसरात सोडण्यात आले. परंतु, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मनोरुग्णाचा पुढील दिवशी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लाखांदुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनादरम्यान मृताच्या पायांवर व शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. murder-of-a-mentally-ill-person त्यानंतर थानेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक थानेदार आशिष गंद्रे, पोलिस उपनिरीक्षक निशांत जनोणकर व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली. चौकशीनंतर पोलीस पाटीलसह अन्य चार आरोपींनी मनोरुग्णास मारहाण करून मृत्यू ओढवून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध हत्या, अॅट्रॉसिटी अॅक्ट व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करत आहेत.