हैदराबाद,
Poet Ande Sri passes away तेलंगणाचे प्रख्यात कवी आणि राज्यगीत “जय जय हे तेलंगणा”चे लेखक अँडे श्री यांचे वयाच्या ६४व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या अंत्यसंस्काराला शासकीय सन्मान देण्यात येणार आहे. कवी अँडे श्री, ज्यांचे पूर्ण नाव अँडे येल्लैया होते, हे तेलंगणाच्या राज्यनिर्मिती आंदोलनातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जातात. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. आज सकाळी ते घरात बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले आढळले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना गांधी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तेलंगणा राज्य शोकाकुल झाले आहे.
मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष एन. रामचंद्र राव यांसह अनेक राजकीय नेत्यांनी अँडे श्री यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे की, “अँडे श्री यांचे निधन हे तेलंगणासाठी अपूरणीय नुकसान आहे. त्यांच्या लेखणीने राज्याला अस्मिता दिली.त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अँडे श्री यांचा अंत्यसंस्कार पूर्ण राज्य सन्मानाने करण्यात येणार आहे.