मुंबई,
Raj Thackeray's Shiv Tirtha मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर अचानक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात पोलिसांची हालचाल वाढली आहे. या सुरक्षा वाढीमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून, कालच मातोश्री येथे घडलेल्या ड्रोन प्रकरणानंतर ही कारवाई झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाभोवती पोलिसांनी दोन्ही प्रवेशद्वारांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. परिसरात पोलिसांच्या गाड्या तैनात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. यानंतरच सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, काल मुंबईच्या बांद्रा परिसरातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर ड्रोन फिरत असल्याचे दिसले होते. या घटनेवरून ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संवेदनशील भागात परवानगीशिवाय ड्रोन उडवणे हे गंभीर सुरक्षा उल्लंघन मानले जाते. त्यामुळे हेरगिरी अथवा विध्वंसाच्या शक्यतेचाही संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित ड्रोन एमएमआरडीएच्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी अधिकृत परवानगी घेऊन उडवण्यात आला होता. तथापि, या घटनेनंतर शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.