नवी दिल्ली,
rat-russia-employment-agreement घटती लोकसंख्या आणि कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे रशिया भारताकडे आशेने पाहत आहे. रशियाला भारतातून कुशल कामगार हवे आहेत आणि सध्या भारतीयांसाठी असलेला कोटा शिथिल करण्याची त्याची इच्छा आहे, जेणेकरून अधिकाधिक भारतीय रोजगारासाठी रशियात जाऊ शकतील. यासाठी दोन्ही देशांमध्ये डिसेंबरमध्ये होणाऱ्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे येत्या काही वर्षांत रशियात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे शिखर परिषदेसाठी भेट देणार आहेत. ईटीच्या वृत्तानुसार, रशियाला भारतातील कुशल कामगार यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी हवे आहेत. सध्या बहुतेक भारतीय फक्त बांधकाम आणि कापड उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. रशियन कामगार मंत्रालयाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार, २०२५ च्या अखेरीस रशियात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या ७०,००० पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात दोहा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारतीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी रशियन समकक्षांशी भेट घेतली, जिथे भारतीय कामगारांच्या हक्कांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. रशियन व्यवहार तज्ज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत भारतातून वाढती लोकसंख्या दोन्ही देशांच्या भागीदारीला अधिक मजबूत आधार देऊ शकते.
दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य देखील वाढत आहे. यावर्षी भारताने रशियामधून विक्रमी प्रमाणात हिरे आणि सोने आयात केले आहे. रशियन मीडिया आरआयए नोवोस्तीच्या वृत्तानुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये रशियाची भारतात हिऱ्यांची निर्यात ३१.३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली होती, जी ऑगस्ट २०२३ मध्ये १३.४ दशलक्ष डॉलर्स होती. तथापि, या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत भारताला रशियन हिऱ्यांचा पुरवठा अंदाजे ४०% ने कमी झाला आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा कच्चा हिऱ्यांचा उत्पादक देश असून ऐतिहासिकदृष्ट्या भारताच्या हिऱ्यांच्या उद्योगाचा प्रमुख पुरवठादार राहिला आहे. तथापि, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५०% करामुळे भारतीय हिऱ्यांच्या उद्योगावर दबाव पडला आहे. २०२५ ची भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद ही २३ वी परिषद असेल. हा शिखर परिषद ४ ते ६ डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे, ज्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन प्रतिनिधित्व करतील. वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मॉस्कोला भेट देऊन शिखर परिषदेचा अजेंडा अंतिम करण्यास मदत करतील.