अरे वा...आता इंटरनेटशिवाय होणार यूपीआय पेमेंट!

10 Nov 2025 10:19:11
नवी दिल्ली,
UPI payment without internet खुशखबर! आता इंटरनेट नसतानाही डिजिटल पेमेंट करणे शक्य झाले आहे. सरकारी क्षेत्रातील बँक इंडियन ओव्हरसीज बँकेने ग्राहकांसाठी ‘UPI 123Pay’ ही नवीन सुविधा सुरू केली आहे. या सेवेमुळे फीचर फोन (Keypad Phone) वापरकर्तेही इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहार करू शकतील, ज्यामुळे रोख रक्कम घेऊन फिरण्याची चिंता संपणार आहे.
 
 
 
UPI payment without internet
‘UPI 123Pay’ मुख्यतः ग्रामीण भागातील आणि फीचर फोन वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या सेवेत इंटरनेटची आवश्यकता नसून व्यवहार मिस्ड कॉल आणि IVR कॉलद्वारे करता येतात. ग्राहकाला प्रथम एका विशिष्ट नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर बँक ग्राहकाला परत IVR कॉल (कॉल बॅक) करेल. ग्राहक व्हॉईस इंस्ट्रक्शन किंवा कीपॅड वापरून पेमेंटची रक्कम आणि UPI पिन प्रविष्ट करू शकतो. योग्य UPI पिन टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होतो.
 
 
देशात अजूनही सुमारे ८५० दशलक्ष लोक डिजिटल पेमेंट वापरत नाहीत, त्यापैकी ४०० दशलक्ष लोक फीचर फोन वापरतात. त्यामुळे ही सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. इंटरनेट नसतानाही आता हे लोक डिजिटल व्यवहार करू शकतील. याशिवाय, या सेवेद्वारे ग्राहक फक्त पेमेंटच नव्हे, तर बँक शिल्लक तपासू शकतो, मागील पाच व्यवहार पाहू शकतो, UPI पिन बदलू शकतो आणि तक्रारी नोंदवू शकतो. भाषेची अडचण टाळण्यासाठी ही सुविधा १२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. इंडियन ओव्हरसीज बँकेने ही सेवा लागू करण्यासाठी नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजी लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. MissCallPay टेक्नॉलॉजी अंतर्गत तयार केलेली ही सुविधा देशातील डिजिटल आर्थिक समावेशनाला बळ देईल आणि भारताला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे पुढे नेईल.
Powered By Sangraha 9.0