फरिदाबाद,
Al-Falah University : दिल्लीतील लाल किल्ला स्फोट आणि ‘व्हाईट कॉलर्ड’ मॉड्युलचा पर्दाफाश झाल्यानंतर हरयाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील मुस्लिमबहुल धौज गावातील अल-फलाह विद्यापीठ आणि त्याचा 76 एकरचा विस्तीर्ण परिसर संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
येथील सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित सूत्रधारांच्या इशाèयावर काम करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विद्यापीठ सुरक्षित आश्रयस्थळ कसे झाले, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, या विद्यापीठाची स्थापना हरयाणा विधानसभेच्या खाजगी विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात आली आहे.
या विद्यापीठाने 1997 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. 2013 मध्ये अल-फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अर्थात् नॅकने ‘अ’ श्रेणी दिली होती. हरयाणा सरकारने 2014 मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा दिला. अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्न आहे.
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा एक उत्कृष्ट पर्याय म्हणून मागील काही वर्षांपासून अल-फलाह विद्यापीठाने स्वतःला सादर केले, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठापासून केवळ 30 किमी अंतरावर असलेले हे विद्यापीठ एका विश्वस्त संस्थेद्वारे चालवले जाते. ही संस्था 1995 मध्ये स्थापन करण्यात आली. जावेद अहमद सिद्दिकी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मुफ्ती अब्दुल्लाह कासमी एमए हे उपाध्यक्ष आणि मोहम्मद वाजिद हे सचिव आहेत. प्रो. डॉ. मोहम्मद परवेझ हे सध्या विद्यापीठाचे रजिस्ट्रार आणि डॉ. भूपिंदर कौर आनंद या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.