अनिल कांबळे
नागपूर,
teachers in school id scam शालार्थ आयडी घाेटाळ्यात नवीन वळण लागले माेठी घडामाेड हाेण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांतच बनावट शालार्थ आयडी घाेटाळ्याशी संबंधित असलेल्या साडेपाचशेवर शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. सायबर पथक आणि विशेष तपास पथक या शिक्षकांना अटक करण्याचे नियाेजन करीत असल्याची गाेपनीय माहिती सूत्रांकडून समाेर आली आहे. पाेलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात नागपूर विभागातील शालार्थ आयडी घाेटाळा सध्या गाजत आहे. याप्रकरणी पाेलिसांत गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. बाेगस शालार्थ आयडी घाेटाळा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजल्यानंतर सरकारने चाैकशीही सुरू केली. पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यात गाजत असलेला बनावट शालार्थ आयडी घाेटाळा बाहेर काढण्यात आला. हा घाेटाळा विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला हाेता. पाेलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्याकडे तपास हाेता. त्यांनी आतापर्यंत दिवसरात्र परिश्रम घेत 17 मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अटक केली. या घाेटाळ्यात सर्वात आधी नीलेश वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासात बारा आराेपींना अटक करण्यात आली. यामध्ये माजी उपसंचालक उल्हास नरड, चिंतामण वंजारी, वैशाली जामदार यांच्यासह शिक्षणाधिकारी, 4 कर्मचारी, चार संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश आहे. तपासात जवळपास साडेसहाशे आयडी बाेगस असल्याची बाब समाेर आली.teachers in school id scam त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी काळुसे यांनी 15 मार्च 2024 या दरम्यान तब्बल 154 शिक्षकांचे बाेगस शालार्थ आयडी तयार झाले नसताना त्यांचे पगार काढण्याची प्रक्रिया केली. याशिवाय राेहिणी कुंभार यांनी 21 मार्च 2022 ते 15 मार्च 2024 या दरम्यान 244 शिक्षकांचे प्रस्ताव बाेगस असताना, अशाच प्रकारे वेतन काढले. त्यामुळे सरकारची 100 काेटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समाेर आली. सध्या पाेलिस पथक हे साडेपाचशे शिक्षकांच्या अटकेचे नियाेजन करीत असल्याचे संकेत पाेलिस सूत्रांकडून मिळाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता आहे.