तिवसा,
confusion-due-to-direction-signs : नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी बायपास मार्गावर हॉटेल साई कृपा जवळ बसविण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर चुकीचे अंतर दर्शविण्यात आल्यामुळे वाहनचालक आणि गुरुदेव भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
संबंधित फलकावर गुरुकुंज मोझरी ३.५० कि.मी. असे अंतर दर्शविण्यात आले असून, प्रत्यक्षात हे अंतर फक्त दीड ते दोन किलोमीटर इतकेच असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. या चुकीच्या अंतरामुळे आणि बायपासच्या सुरुवातीच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहनचालक गोंधळून जातात आणि अपघात मोठ्या प्रमाणात घडतात. याच गोंधळामुळे वाहन चुकीच्या वळणावर जातात. अनेकवेळा वाहतूक कोंडीतर होतेच परंतु, अपघातांच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बसविलेला हा फलक चुकीचे दिशादर्शन करतो. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, एका आठवड्यात सरासरी एक ते दोन अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस अंधार आणि चुकीचे नियोजनामुळे वाहनचालकांना मार्ग ओळखण्यात अडचण येते. तसेच, महामार्गाच्या कडेला लोखंडी पूलाचे अवशेष गेल्या कित्येक महिन्यांपासून पडून आहेत, जे मूळतः दिशादर्शक फलक बसविण्यासाठी आणले गेले होते. मात्र, आजही ते तसेच पडून असून, यावरून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो. स्थानिक विविध पक्षांनी तसेच संघटनांनी एनएचएआयच्या अधिकार्यांना अनेकवेळा निवेदन देऊन तातडीने स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली आहे. तरीसुद्धा अधिकार्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे.
गतिरोधक व अचूक फलक लावा
मोझरी बायपास महामार्गावरील लावलेला दिशादर्शक फलक पूर्णतः चुकीचा असून तो तातडीने काढण्यात यावा. त्याऐवजी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तीर्थक्षेत्र — गुरुकुंज आश्रम, मोझरी’ असा स्पष्ट उल्लेख व अचूक अंतर असलेला नवा फलक बसवावा. या भागात वारंवार अपघात घडत असल्याने तातडीने स्पीड ब्रेकर व चेतावणी फलक बसविण्याची आवश्यकता आहे. आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन गाढ झोपत असल्याचे दिसून येते. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अंतर दाखविणारे दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे.
-हेमंत बोबडे
तालुकाध्यक्ष, रा. काँ. शरद पवार गट)