सीएसके आता 'या' पाच खेळाडूंना घरचा रस्ता दाखविणार!

12 Nov 2025 13:01:49
नवी दिल्ली,
CSK players चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ सध्या मोठ्या गोंधळात सापडला आहे. आयपीएल २०२५ चा हंगाम हा या पाचवेळा विजेत्या संघासाठी एकप्रकारे दुःस्वप्न ठरला. पॉइंट टेबलच्या तळाशी राहिलेल्या या संघाने कर्णधारपद, संघाचे संतुलन आणि खेळाडूंची फॉर्म अशा सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. त्यामुळे आता व्यवस्थापनाने संघात मोठे बदल करण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघ रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोन मोठ्या नावांना रिलीज करणार आहे. त्यांच्याऐवजी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला ट्रेडद्वारे संघात सामील करण्याची शक्यता आहे. मात्र, बदल इथेच थांबणार नाहीत. सूत्रांच्या मते, सीएसके आणखी पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे.

CSK players  
 
 
या यादीत पहिलं नाव आहे डेव्हॉन कॉनवेचं. गेल्या हंगामात कॉनवेकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्याची संथ सुरुवात आणि वारंवार झालेल्या दुखापतींमुळे संघाचं संतुलन बिघडलं. त्यामुळे सीएसके आता परदेशी फिनिशर खेळाडूवर भर देण्याचा विचार करत आहे. दुसरं नाव आहे राहुल त्रिपाठीचं. संघाने त्याच्यावर मधल्या फळीत विश्वास दाखवला, पण पाच सामन्यांत केवळ ५५ धावा करीत तो अपयशी ठरला. त्याचा कमी स्ट्राईक रेट आणि प्रभावहीन खेळ पाहता संघ त्याला सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो.
 
 
विजय शंकरलाही निराशाजनक कामगिरीचा फटका बसू शकतो. अपेक्षित अष्टपैलू कामगिरी तो दाखवू शकला नाही. सहा सामन्यांत केवळ ११८ धावा आणि गोलंदाजीत कोणताही ठसा उमटवता न आल्याने त्याचं नावही रिलीज लिस्टमध्ये असू शकतं. मुकेश चौधरी हा आणखी एक खेळाडू आहे ज्याच्याकडून संघाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. दोन सामन्यांत फक्त एक बळी मिळवणाऱ्या मुकेशच्या जागी सीएसके अनुभवी वेगवान गोलंदाज शोधण्याच्या तयारीत आहे. दीपक हुडालाही संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. सात सामन्यांत फक्त ३१ धावा आणि स्ट्राईक रेट केवळ ७५ इतका राहिला. मधल्या फळीत स्थैर्य देण्याऐवजी त्याने संघाच्या डोकेदुखीत भरच घातली.
 
आता संघ व्यवस्थापनाचे सर्व लक्ष संजू सॅमसनच्या ट्रेडकडे लागले आहे. जर हा सौदा अंतिम झाला, तर सीएसकेचा टॉप ऑर्डर पुन्हा दमदार होईल आणि संघाला नवीन जोशाने पुढील हंगामात उतरता येईल. नवीन तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांसह, चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा पुनरागमनाची स्वप्ने पाहत आहे.
Powered By Sangraha 9.0