नवी दिल्ली
Delhi blast लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)च्या तज्ज्ञांनी स्फोटस्थळाची तपासणी करताना चाळीसहून अधिक नमुने गोळा केले आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या नमुन्यांमध्ये दोन काडतुसे — त्यापैकी एक जिवंत — आणि दोन भिन्न प्रकारच्या स्फोटकांचे नमुने आढळले आहेत. प्राथमिक तपासात एक नमुना अमोनियम नायट्रेटचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.सोमवारीच फरीदाबाद परिसरात ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अल फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉ. मुझम्मिल गनी आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या मते, दुसरा स्फोटक नमुना अमोनियम नायट्रेटपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे दिसून येत आहे, मात्र त्याचे अचूक रासायनिक स्वरूप विस्तृत फॉरेन्सिक तपासणीनंतरच निश्चित होणार आहे.
सोमवारी लाल Delhi blast किल्ल्याच्या ट्रॅफिक सिग्नलजवळ धीम्या गतीने चालणाऱ्या एका हुंडई i20 गाडीत झालेल्या या स्फोटात बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्फोटात वापरलेल्या स्फोटकांचा प्रकार आणि यंत्रणा शोधण्यासाठी तपास जोरात सुरू असून एफएसएलची विशेष टीम या नमुन्यांचे विश्लेषण करत आहे. या टीमला शक्य तितक्या लवकर प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रयोगशाळा २४ तास कार्यरत आहे.दरम्यान, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सक्रिय झाले होते. या गटाचा उद्देश दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर मालिकाबद्ध स्फोट घडवण्याचा होता. तपासात उघड झाले आहे की स्फोट झालेल्या गाडीत सुमारे ८० किलो स्फोटक भरलेले होते,Delhi blast मात्र त्यात डेटोनेटर किंवा टाइमर नव्हता.सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या साथीदारांच्या अटकेनंतर दहशतवादी डॉक्टर उमर घाबरून गेला होता. वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा करत असताना त्याने भीती आणि तणावाच्या भरात स्वतःच स्फोट घडवून आणला. तपास यंत्रणा आता या घटनेमागील संपूर्ण मॉड्यूल, पुरवठा साखळी आणि संभाव्य सहकाऱ्यांचा शोध घेत असून, दिल्ली आणि हरियाणामध्ये तपास वाढवण्यात आला आहे.या घटनेने पुन्हा एकदा राजधानीच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. तपास यंत्रणा आणि एफएसएलचे अहवाल पुढील काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे.