मुंबई,
denvendra fadanvis news समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण करीत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील मिळणाऱ्या पदाचा उपयोग करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन करीत राज्याच्या विकास गाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळण्याची अपेक्षाही व्यक्त केली. प्रशासनात आलेल्या आपल्या बॅचला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची संधी आहे. या तंत्रज्ञानाच्या साहायाने नागरिक केंद्रित व जबाबदार प्रशासन व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केले.
सन २०२४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना समवेत आज वर्षा निवासस्थानी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते. संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य आहे. राज्यामध्ये ग्रामीण विकास केंद्रित प्रशासनच्या ऐवजी नागरी विकास केंद्रित प्रशासन करणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे नागरी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे.
संतुलित व सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन १०० सुधारणा करीत आहे. या सुधारणांसाठी ' वॉर रूम' तयार करण्यात आली आहे. महसूल सुधारणांसाठी अन्य व्यक्तींना सल्लागार म्हणून नेमाण्यापेक्षा प्रशासनातील दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा खूप चांगला परिणाम दिसून आला. नुकतीच शासनाने औद्योगिक प्रयोजनासाठी राज्यामध्ये अकृषक परवाना काढण्याची मोठी सुधारणा केली आहे. वेळखाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया दूर करीत राज्यात गतिमान प्रशासन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महसूल विभाग अंतर्गत बरीच प्रक्रिया, सेवा ब्लॉक चेन पद्धतीवर आणण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच प्रक्रिया जलद व अचूक होत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण प्रशासकीय धोरणे, प्रक्रिया यांचे ' व्हिजिट' करून ' रिइंजिनिअरिंग' करण्यासाठी शासनाने १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या माध्यमातून बऱ्याच सुधारणा करण्यात येत आहे. राज्यात सार्वत्रिक औद्योगिक विकास होण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे. मुंबई, पुणे प्रमाणेच छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक यासह राज्यात अन्य भागात नवीन औद्योगिक पट्टे निर्माण करण्यात येत आहे. विदर्भामध्ये नागपूर - अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होत आहे. अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क तसेच वस्त्रोद्योग पार्कमुळे औद्योगिक विकासाची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत आज एकही भूखंड शिल्लक राहिलेला नाही. अमरावती विमानतळ नागरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी एअर इंडियाच्यावतीने आशिया खंडातील सर्वात मोठे ' पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' उभारण्यात येत आहे.
दुर्गम, नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीची ओळख आता ' स्टील सिटी' म्हणून होत आहे. या जिल्ह्यात तीन लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांसाठी करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाने राज्याची राजधानी व उपराजधानी जोडली आहे. त्यामुळे गतीने दळणवळण यंत्रणा निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. टोयोटा किर्लोस्कर कंपनी छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रकल्प स्थापन करीत आहे. त्यामुळे या भागात विकासाची परिसंस्था अधिक बळकट होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, मागील अनुभव, महाराष्ट्रात काम करत असताना जाणवलेल्या चांगल्या बाबी, सुधारणा करणे गरजेचे असलेल्या बाबी याविषयी विस्तृत संवाद साधला.