वर्धा,
Theatre Day : रंगभूमी दिनानिमित्त ५ नोव्हेंबर रोजी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात सार्वजनिक वाचनालयातर्फे सुप्रसिद्ध नाट्य अभिनेता सुनील तितरे यांनी कै. लक्ष्मण देशपांडे लिखित वर्हाड निघालंय लंडनला या जगप्रसिद्ध विनोदी एकपात्री नाटकाचा नितांत सुंदर असा नाट्यप्रयोग सादर केला. सलग दोन तास चाललेल्या या नाट्य प्रयोगाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली.
खचाखच भरलेल्या हॉलमध्ये मिष्किल विनोदावर हास्यांची क्षणोक्षणी कारंजी उसळत होती. हास्यरसात ओथंबून वाहणार्या प्रेक्षकांनी अभिनेता सुनील तितरे यांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली व टाळ्यांच्या गजरात वर्हाड निघालंय लंडनला या यशस्वी आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नाट्यप्रयोग संपन्न झाला. यावेळी जुन्या जाणत्या प्रेक्षकांनी सुनील तितरे यांच्या अभिनय कौशल्याने कै. लक्ष्मण देशपांडे यांची आठवण करून दिल्याचा अभिप्राय व्यत केला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला नटराज पूजन होऊन प्रा. विकास काळे, श्याम सरोदे आणि संच यांनी नांदी गीत सादर केले. त्यानंतर पद्मश्री फाउंडेशन नागपूर तर्फे अध्यक्ष डॉ. संजय आदमने व प्रमोददादा घोंगे यांनी सपत्नीक अभिनेता सुनील तितरे व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विकास फटिंगे यांचा राज्यस्तरीय रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार २०२५ ने मानचिन्ह, शॉल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या नाटकाला संजय राहाटे, राजेश रोडे, विश्वास पंडित, सोनू मुलचंदानी, सुनील नवघरे आणि सुविधा झोटिंग यांचे सहकार्य लाभले.