स्वागत समारंभात नवरदेवावर जीवघेणा हल्ला

12 Nov 2025 21:11:17
अमरावती, 
fatal-attack-on-groom : लग्न समारंभानंतर स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी व आप्तेष्टांच्या शुभेच्छा, आशिर्वाद स्वीकारत असलेल्या नवरदेवावर चाकूचे वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमरावती - बडनेरा मार्गावरील साहील लॉन येथे मंगळवारी रात्री साडे दहा वाजताचे सुमारास घडली.
 
 
 
lk
 
 
 
शहरातील तिलक नगर येथील सुजल राम समुंद्रे (२३) याचा ९ तारखेला अंजनगाव सुर्जी येथील युवतीसोबत विवाह समारंभ पार पडला होता. यानंतर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी स्वागत समारंभाचे आयोजन बडनेरा मार्गावरील साहील लॉन येथे करण्यात आले होते. स्वागत समारंभ सुरु असताना अचानक काही युवक दुचाकीने त्याठिकाणी पोहोचले. यावेळी राघव बक्षी नामक युवक अन्य युवकांना थांबवून सुजल समुंद्रे याला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर गेला. यावेळी त्याने हसत त्याचे अभिनंदन केले. मात्र अचानक त्याने चाकू काढून सुजल याच्यावर तीन वार केले. त्याने एक वार कमरेवर तर दोन वार डाव्या मांडीवर केल्याचे सांगितल जात आहे.
 
 
हल्ल्यात सुजल जखमी होवून खाली कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे समारंभात एकच कल्लोळ उडाला. आरडाओरड सुरु असताना हल्लेखोर युवक राघव बक्षी हा तेथून पळत थेट मुख्य प्रवेशद्वाराजवळ निघाला. परंतु, जखमी सुजल याचे वडील हल्लेखोराच्या मागे धावले. हल्लेखोराने त्यांना चाकूचा धाक दाखवून ते पसार झाले. या घटनेनंतर जखमी सुजल यास जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बडनेरा पोलिस ठाण्यात हल्लेखोर राघव बक्षी याच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहे.
 
 
//हल्ल्यास पैश्याच्या वादाची किनार
 
 
सुजल समुंद्रे याच्यावरील हल्ल्यास पैशाची किनार आहे. हल्लेखोर युवक राघव बक्षी याने सुजल समुद्रे याच्या लग्नात डिजे लावण्यासाठी मदत केली होती. परंतु, लग्न समारंभ आटोपल्यानंतर त्याने सुजल यास पैश्याची मागणी केली. मात्र त्यास पैसे दिले नसल्याने हाच वाद झाला असल्याचे सांगण्यात येते.
 
 
हल्लेखोराच्या घरावर हल्ला
 
 
दरम्यान, स्वागत समारंभात सुजल समुंद्रे याच्यावर हल्ला करणार्‍या राघव बक्षी याच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याचे राघवच्या आईने बडनेरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर हल्ला सुजलचे वडील राम समुंद्रे व सोनु समुंद्रे, शिवा समुंद्रे यांनी केल्याचे आणि घरातील टीव्ही, दुचाकी फोडून अन्य एक दुचाकी जाळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर प्रतिहल्ल्याच्या घटनेने बडनेरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0