वर्धा,
bribery-case : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कडबा कुटी यंत्राकरिता जास्त अनुदान मिळवून देण्याकरिता एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृषी पर्यवेक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली. तो हिंगणघाट येथील कृषी मंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत असून त्याच्यासोबत एका खासगी व्यक्तीलाही अटक केली असून ही कारवाई वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी हिंगणघाट येथे केली.
बाबाराव उत्तमराव नाईक (४७, रा. समतानगर, सावंगी मेघे) कृषी पर्यवेक्षक आणि संकेत घनश्याम विटाळे (२५, रा. सावली वाघ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. तक्रारदार शेतकऱ्याने कडबा कुटी यंत्राकरिता ऑनलाइन अर्ज केला होता. त्याचा अर्ज मंजूर होेऊन त्याने ३७ हजार ५२० रुपयांचे यंत्रही खरेदी केले होते. त्या मशीनची पाहणी करण्याकरिता कृषी पर्यवेक्षक बाबाराव नाईक शेतकऱ्याचे घरी गेला होता.
तेव्हा शासनाकडून जास्तीत जास्त अनुदान मिळवून देण्याकरिता एक हजारांची लाचेची मागणी केली. त्यामुळे शेतकऱ्याने यासंदर्भात वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे बुधवारी सापळा रचून अधिकाऱ्यांनी हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक नाईक व खासगी व्यक्ती संकेत विटाळे यांना अटक केली. ही कारवाई लाचलुपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी बावीसकर, पोलिस उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप मुकडे, कान्होपात्रा बन्सा, मंगेश गंधे, पंकज डाहाके, मंगेश झामरे, सचिन गाडवे, राखी फुलमाळी, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे, मनिष मसराम, विनोद धोंगडे, लक्ष्मण केंद्रे, गणेश पवार, विष्णू काळुसे, अश्विनी भानखेडे व गणेश मसराम यांनी केली.
ऑनलाइन स्वीकारली लाचेची रक्कम
शेतकऱ्याला अनुदान वाढीसाठी एक हजार रुपये मागितल्यानंतर बुधवारी ही रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार कृषी पर्यवेक्षक नाईक याने संकेत विटाळे याला तक्रारकर्त्याच्या व्हाट्सॲपवर रक्कम मागण्याचा संदेश करायला लावले होते. त्यानंतर संभाषणही घडवून आणले. अखेर ठरल्यानुसार तक्रारकर्त्याने संकेतच्या मोबाइलवर ऑनलाइन एक हजार रुपये पाठविल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यालाही आरोपी बनविले.