13 व 14 नोव्हेंबरला यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांचे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन यवतमाळात आयोजित

12 Nov 2025 10:09:45
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
inspire award exhibition भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवीनगर, नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद, यवतमाळ तसेच विशुद्ध विद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांचे जिल्हास्तर इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनचे 13 व 14 नोव्हेंबर रोजी यवतमाळात आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, बालवैज्ञानिक व शिक्षक तथा त्यांच्या प्रतिकृतींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी होत असलेले हे प्रदर्शन यावर्षी येथील विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयात आयोजित केले आहे. यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांचे एकत्रितपणे होत असलेल्या या प्रदर्शनात 161 बाल वैज्ञानिकांच्या प्रतिकृती प्रदर्शित होणार आहे. यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती राज्यस्तरावर निवडल्या जातील.
 
 

इन्स्पीरे अवॉर्ड  
 
 
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांचे हस्ते होणार आहे. विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते हे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समिती अध्यक्ष मंदार पत्की, राज्य विज्ञान संस्था नागपूरचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी)च्या शास्त्रज्ञ शिवाणी सिंग व विशुद्ध संस्थेचे सचिव विजय कासलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, यवतमाळ जिपचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुकाराम भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा परिषद वाशिमच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धोपे, जिल्हा परिषद बुलढाण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ उपस्थित राहणार आहेत.inspire award exhibition इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन 13 नोव्हेंबरला दुपारी 2 ते 5.30 व 14 नोव्हेंबरला सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहील. 13 नोव्हेंबरला संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
या प्रदर्शनासाठी विविध समित्या तयार करण्यात आले आहेत. इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा विद्यार्थी, शिक्षक तथा विज्ञानप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (योजना) किशोर पागोरे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी तसेच आयोजन समितीने केले आहे.
Powered By Sangraha 9.0