महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल: डॉ. किरण पाटील

12 Nov 2025 20:56:47
बुलढाणा, 
Kiran Patil : महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण मोहीम लवकरच बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाणार असून हे महिलांच्या आरोग्याच्या दिशेने महत्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
 
 
kiran
 
 
 
एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत नियोजन, समन्वय आणि जनजागृतीसाठीची महत्वाची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब सय्यद, तसेच आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, अल्पसंख्याक व आयसीडीएस विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
बैठकीदरम्यान महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणार्‍या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. बदलत्या जीवनशैली, असंतुलित आहार, तणाव आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा कर्करोग महिलांमध्ये झपाट्याने वाढत असून, सध्या देशातील महिलांमध्ये होणार्‍या कर्करोगांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा असा व्हायरस आहे जो महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. हा संसर्ग लैंगिक संपर्काद्वारे होऊ शकतो.लसीकरण केल्यास शरीरात या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका तब्बल ९९ टक्क्यांनी कमी होतो. खासगी रुग्णालयांमध्ये ८ ते १० हजार रुपयांपर्यंत किंमत असलेली ही लस आता शासनाच्या पुढाकारामुळे १४ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींना मोफत देण्यात येणार आहे.
 
 
यासाठी शाळांमार्फत सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक शाळेतील मुलींची माहिती संकलित केली जात आहे. या मोहिमेचा लाभ फक्त शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने डॉटर, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहीम औपचारिकपणे सुरू होईल, अशी माहिती जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी दिली. एचपीव्ही लसीकरण ही फक्त लस नसून, महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य संरक्षणाचे प्रभावी शस्त्र आहे. वेळेवर लसीकरण झाल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू व शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतील. अनेक वेळा या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला घेणे आणि कझत लसीकरणाबाबत जागरूकता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने घेतलेला हा उपक्रम ‘आरोग्यदायी माता सशक्त समाज’ या ध्येयाकडे नेणारे एक मोठे पाऊल असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
Powered By Sangraha 9.0