चंद्रपूर,
marathi-drama : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरिष्ठ रंगकर्मी व नाट्यलेखक डॉ. शरदचंद्र सालफळे यांनी भूषवले. उद्घाटन झाडीपट्टी अभ्यासक व लेखक डॉ. श्याम मोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. जयश्री कापसे, परीक्षक वैभव मावळे, रुपाली मोरेख, डॉ. विजय रावल मान्यवर उपस्थित होते. अतिथींच्या उपस्थितीत नटराजपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्पर्धा समन्वयक चैतन्य सदाफळ यांनी मान्यवर व प्रेक्षकांचे स्वागत केले.
ही नाट्यस्पर्धा 29 नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले की, 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत एकूण 15 संघ सहभागी झाले असून, त्यात चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यातील संघांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या कार्यक्रमात चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन ऑफिसर्स रिक्रिएशन सेंटर यांच्यावतीने ‘दि अॅनॉनिमस’ या नाटकाचेसादरीकरण करण्यात आले. संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील सर्व नाटकांना अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.