पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे लग्नासाठी मुली मिळेनात!

12 Nov 2025 17:06:51
पुणे,
marriage due to leopard terror उत्तर पुणे जिल्ह्यातील काही खेडे, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे तरुणांची लग्न रखडल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याची भीती पसरल्यामुळे पालक आपल्या मुली देण्यासाठी तयार नाहीत, तर तरुण आपली जोडी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. गावातील तरुण आर्थिकदृष्ट्या स्थिर असूनही बिबट्याच्या दहशतीमुळे पालकांना मुलींचे लग्न करणे धोकादायक वाटत आहे.

marriage due to leopard terror
 
 
नागरिकांनी सांगितले की, पोरं आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत, परंतु बिबट्याच्या भीतीमुळे आई-वडिलांचा जीव व्याकुळ झाला आहे. तरुण मुलींच्या लग्नाची स्वप्नं रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु शेतशिवारांमध्ये झुंडीने फिरणाऱ्या बिबट्यांमुळे पशुधनावर सतत हल्ले होत आहेत आणि काही प्रकरणांमध्ये मानवी जीवही गेल्याचे नोंदवले गेले आहेत. याचा थेट परिणाम सामाजिक जीवनावर झाला असून शेकडो तरुणांना जोडी मिळत नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
 
 
उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरादळे येथे तीन बिबटे एकत्र फिरताना पाहण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता, नागरिकांसाठी घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे. राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अद्याप अपयशी ठरत आहेत. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता या बिबट्यांना जेरबंद करणे ही वनविभागासमोरील मोठी जबाबदारी बनली आहे.
Powered By Sangraha 9.0