शिरसगाव कसबा,
new-insurance-date : दिवाळी गेली तरी विमा परतावा रक्कम शेतकर्यांच्या पदरी पडणार की नाही? असा सवाल शेतकरी करीत आहे. अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांना मागील वर्षीच्या हंगामातील हवामान आधारित आंबिया बहार फळ पीक विमा नुकसान भरपाई वाटप करण्यात मागील वर्षी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने विलंब केला. यंदा सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
हवामान आधारित फळपिक विमा २०२४-२५ वर्षांमध्ये नोव्हेंबर महिन्यात सोम्पो यूनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनीद्वारे शेतकर्यांनी काढला होता. जिल्ह्यातील एकूण ३८३७ संत्रा उत्पादक शेतकर्यांनी ३८७५ हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजित तीन कोटी तीस लाख बेचाळीस हजार पाचशे साठ रुपये पिकविमा हिस्सा भरला. मागील वर्षी संत्रा पिकविमा परतावा उशिरा मिळाल्याने अनेक शेतकरी विमा काढू शकले नाही. संत्रा फळगळ, बुरशीजन्य रोग, झाडे सुकणे अशा विविध प्रकारच्या रोगांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी दखल घेऊन शेतकर्यांच्या खात्यात परतावा रक्कम जमा करावी जेणेकरून पुढील हंगामाचा नवीन विमा काढू शकेल.
//तक्रारी दाखल, उत्तर नाही!
एप्रिल, मे महिन्यात तापमान ४०-४५ अंशापेक्षा अधिक राहुन फळगळ झाली. नुकसानीनंतर विमाधारकांनी १४४४७ कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर विमा परतावा न मिळाल्याबाबत तक्रारी केल्या. उचित मार्गदर्शन न मिळणे, वस्तुस्थिती न सांगणे अशी परिस्थिती कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाची आहे, असे शेतकर्यांनी सांगितले.
//नवीन काढायचा कसा?
फळ नुकसान भरपाई भरून निघण्यासाठी शेतकर्यांनी विमा काढला. पण, ट्रिगर कालावधी संपला, नवीन बहार घेण्यासाठी मशागत करण्याची वेळही आली. परंतु, शासन आणि कंपनीच्या वेळकाढू चक्रव्यूहात शेतकरी कुटला जातोय. अशी आर्त हाक शेतकर्याच्या मनातून येत आहे. जिल्हास्तरावरून ट्रिगर तात्काळ लागू करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी सांगितले.