एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविणार : ना. भोयर

12 Nov 2025 18:53:37
वर्धा,
Questions from ST employees आयुष्यभर एसटी महामंडळात आपली सेवा देणार्‍या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन गोलाईत, विभागीय सल्लागार उल्हास चोरे, उपाध्यक्ष सुधाकर लोंधे, हिरामण बलवीर, सचिव विठोबा पारसे, सहसचिव मनोहर किटे, कार्याध्यक्ष शालिकराम चंदनखेडे, कोषाध्यक्ष अशोक जगताप, कार्यकारी सदस्य रमेश झोरे, शेख नबी ईस्माईल, एकनाथ चिचाटे, नारायण देशमुख यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
 
 
questions-from-st-employees
 
 
यावेळी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी आपली आपबिती कथन केली. एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना दरमाह १ ते २ हजार रुपये पेन्शन दिल्या जाते. एकीकडे वाढते वय, औषधांचा खर्च व भरण पोषण यातून करणे कठीण आहे. आयुष्यभराच्या नोकरीचा पैसा मुलांचे शिक्षण व लग्न तसेच अन्य कामांवर खर्च झाले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कर्मचार्‍यांना पेन्शनचा आधार असतो. परंतु, नगण्य पेन्शन मिळत असल्याने यात कसे जगायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने दरमाह ५ हजार रुपये अनुदान अथवा मदत द्यावी. एसटी सेवेतून निवृत्त झाल्याने पती-पत्नी यांना मोफत प्रवासाची पास दिल्या जाते. परंतु, ही पास लाल बससाठी आहे. आज लाल बसची सेवा फारच कमी आहे. त्यामुळे ही सेवा अन्य बसमध्ये देखील देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.  मागणीला उत्तर देताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, या दोन्ही मागण्या रास्त असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप नाईक यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच संघटनेच्या राज्य प्रतिनिधींशी बैठक लावण्याबाबत पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
Powered By Sangraha 9.0