सुखोई लढाऊ विमानाची आपत्कालीन लँडिंग, मोठा अपघात टळला

12 Nov 2025 12:04:27
डेहराडून,
Sukhoi's emergency landing भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे देहरादूनच्या जॉली ग्रँट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्याने एकच खळबळ उडाली. हे विमान बरेली येथून उड्डाण करून आले होते. उड्डाणादरम्यान अचानक एका इंजिनमधून तेलगळती सुरू झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ नियंत्रण राखत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला.
 
Sukhoi
 
संग्रहित फोटो 
सुदैवाने, लढाऊ विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान उतरल्यानंतर ते टर्मिनलपासून थोड्याच अंतरावर असलेल्या व्हीआयपी गेस्ट हाऊससमोर सुरक्षित ठिकाणी उभे करण्यात आले. घटनेनंतर तात्काळ बरेली येथून हवाई दलाच्या तांत्रिक तज्ज्ञांची एक टीम देहरादून येथे पोहोचली असून, विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
विमानतळ संचालक भूपेश सीएच नेगी यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळेच हे विमान आपत्कालीनरीत्या उतरवण्यात आले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. विशेष म्हणजे, एप्रिल २०१८ मध्ये सुखोई विमानांनी देहरादून विमानतळावर सराव उड्डाणे केली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे आपत्कालीन लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हवाई दलाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असल्याने या घटनेबद्दल विमानचालन अधिकाऱ्यांनी वैमानिकांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे.
Powered By Sangraha 9.0