‘वेतन द्या, नाहीतर इच्छामरण द्या!’

12 Nov 2025 18:01:26
नागपूर, 
teachers-anger-due-to-delayed-salaries शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थांबविण्यात आलेल्या शिक्षकांचा संताप अखेर उफाळून आला आहे. बुधवारी शहरातील संविधान चौक येथे शेकडो शिक्षकांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. “वेतन द्या, नाहीतर इच्छामरण द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे ६३२ शिक्षकांचे वेतन बंद ठेवण्यात आले असून, या निर्णयामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
 

teachers-anger-due-to-delayed-salaries 
 
संबंधित शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर, न्यायालयाने “शिक्षकांचे रखडलेले वेतन तातडीने अदा करण्यात यावे” असा आदेश दिला होता. तथापि, आदेश मिळूनही वेतन अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. teachers-anger-due-to-delayed-salaries शिक्षकांचे म्हणणे आहे की, “आम्ही नियमितपणे अध्यापन करत असतानाही आठ महिन्यांपासून वेतन बंद ठेवणे ही अन्यायकारक बाब आहे. घरखर्च, कर्जफेड, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च या सर्व गोष्टींचा डोंगर आमच्यासमोर उभा आहे. काही शिक्षकांना घर चालवणे कठीण झाले असून, मानसिक ताण वाढला आहे.” या आंदोलनात विदर्भ शिक्षक संघ, विदर्भ शिक्षक परिषद आणि शिक्षक बचाव समिती या संघटनांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत “शालार्थ प्रकरणाची चौकशी स्वतंत्रपणे करा, पण निरपराध शिक्षकांचे वेतन रोखू नका” अशी मागणी केली. दरम्यान, शिक्षण विभागाने आंदोलनाची दखल घेत “प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल” असे आश्वासन दिले आहे. शिक्षक संघटनांनी मात्र इशारा दिला की, “१५ दिवसांत वेतन प्रक्रिया सुरू न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल.”
 
 
Powered By Sangraha 9.0