तभा वृत्तसेवा
महागाव,
tejas-narwade : महागाव शहरातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख तेजस नरवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले असून, त्यांच्या या पावलामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
नरवाडे हे आक्रमक शैली आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनात शेतकरी आंदोलन, मोर्चे यामुळे पक्षाला शहरात संघटनात्मक बळकटी मिळाली होती. राजीनामा देताना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मी बाळासाहेबांच्या नेतृत्वावर व हिंदुत्वाच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास ठेवतो. मात्र वैयक्तीक कारणांमुळे पदाचा राजीनामा देत आहे. पुढेही समाजकार्यास आणि जनतेच्या तत्त्वनिष्ठ कार्यासाठी कटिबद्ध राहीन, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.
नरवाडे यांच्या राजीनाम्यानंतर महागाव शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ते पुढे कोणत्या भूमिकेत दिसतील, हे सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरले असून त्यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांच्या मते, हा राजीनामा भविष्यातील महागावच्या नगर पंचायत निवडणुकीतील टर्निंग पॉइंट ठरू शकतो.