नवी दिल्ली,
terrorist activities in Maharashtra दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर राज्यभरातील दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सक्रिय झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुंब्रा परिसरानंतर आता पुण्यातील कोंढवा भागात एटीएसने छापेमारी करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा संबंध अटक केलेल्या दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या या व्यक्तीकडून कसून चौकशी सुरू असून, त्याच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

माहितीनुसार, पुण्यातील कोंढव्यात एटीएसचे पथक बुधवारी पहाटे कारवाईस उतरले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारीदरम्यान परिसर सील करण्यात आला होता. प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेला व्यक्ती काही काळापासून जुबेर हंगरगेकरसोबत संपर्कात होता. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार आणि काही संशयास्पद संवाद झाल्याचा तपासात उल्लेख आहे. तपास यंत्रणांकडून त्याच्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी एटीएसने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात एका शिक्षकाच्या घरावर मोठी धाड टाकली होती. या शिक्षकाचा संबंधही पुण्यात अटक झालेल्या काही संशयितांशी असल्याची माहिती समोर आली होती. मुंब्रा येथील कौसा विभागातील या निवासस्थानी तपास मोहिमेदरम्यान एटीएस अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन, संगणक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर संबंधित शिक्षकाला अधिक चौकशीसाठी कुर्ल्यातील त्याच्या दुसऱ्या घरात नेण्यात आले.
या कारवाईनंतर शिक्षकाची पत्नी समोर आली आणि तिने आपल्या नवऱ्याचे सर्व आरोप फेटाळले. माझ्या पतीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ते दीर्घकाळ मुंबईतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि निवृत्तीनंतर घरीच राहातात. त्यांना विनाकारण या कारवाईत अडकवले जात आहे, असे ती म्हणाली. सध्या महाराष्ट्र एटीएसकडून राज्यातील विविध शहरांमध्ये समन्वित तपास आणि छापेमारी मोहीम सुरू आहे. दहशतवादी नेटवर्कशी संबंधित अनेक ठिकाणांची चौकशी करण्यात येत असून, या तपासातून आणखी काही नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.