कोलोराडो,
Warning bell for India-Nepal-China पृथ्वीच्या पृष्ठभागाचा नैसर्गिक प्रवाह सतत चालू असतो; मात्र अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भारतीय टेक्टोनिक प्लेटबाबत एक धक्कादायक शोध लावला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, भारताची मुख्य टेक्टोनिक प्लेट (इंडियन प्लेट) तिबेटच्या खाली १०० किलोमीटर खोलीवर दोन स्वतंत्र भागांत विभागली जात आहे. या विभागणीमुळे वरचा भाग हिमालयाकडे सरकत असून, खालचा भाग मंगोलियाकडे सरकत आहे. ही दरी सुमारे २००-३०० किलोमीटर लांब आहे आणि भविष्यात भूकंप, ज्वालामुखी उद्रेक व मोठ्या भूगर्भीय बदलांसाठी कारणीभूत ठरू शकते.
पृथ्वीचे कवच अनेक टेक्टोनिक प्लेट्समध्ये विभागलेले आहे, जे हळूहळू सरकत असतात. भारतीय प्लेट आफ्रिका आणि ऑस्ट्रेलेशिया या प्लेटपासून वेगळी होऊन उत्तरेकडे सरकली आणि हिमालयाची निर्मिती झाली. सध्या, या प्लेटच्या तळाचा भाग वितळण्याच्या प्रक्रियेत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. कोलोरॅडो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, खालचा वितळलेला भाग जसे उष्णतेमध्ये आईस्क्रीम वितळते तसे वितळत आहे, ज्यामुळे मॅग्मा वाढतो आणि ज्वालामुखी सक्रिय होण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर प्लेट फुटण्याची ही प्रक्रिया वेगाने घडली तर ८-९ रिश्टर स्केलच्या भूकंपांचा धोका उभा राहू शकतो. हिमालयीन प्रदेश, भारत, नेपाळ आणि चीनमध्ये लाखो लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. भूकंपामुळे घरे कोसळण्याची, पूर येण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात ९,००० लोकांचा मृत्यू झाल्याची आठवण आपणास आहे. मॅग्मा वाढल्यामुळे नवीन ज्वालामुखी उद्रेक होण्याची शक्यता आहे, तर हिमनद वितळल्याने गंगा-ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये पूर येऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या, संभाव्य नुकसान लाखो कोटी रुपये होऊ शकते. पर्यावरणीय दृष्टीने हिमालयातील जैवविविधतेला धोका, हवामान बदलाला गती आणि नद्या-पाणलोट यावर परिणाम होऊ शकतो.
भूकंपाच्या लाटा आणि प्लेटच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी GPS डेटा, उपग्रह प्रतिमा आणि भूकंप मापन यंत्रांचा वापर केला. त्यांनी निरीक्षण केले की तिबेटच्या खाली असलेली प्लेट हळूहळू फाटत आहे आणि दरवर्षी ५ मिमीने सरकणाऱ्या वरच्या भागामुळे खालच्या भागावर दबाव वाढतो. भारत सरकारने या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवून भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) आणि राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राला (NCS) निधी उपलब्ध करून दिला आहे. तिबेट सीमेवर ५० नवीन सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे मोकळी प्लेट हालचालीवर सतत लक्ष ठेवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमालयाचे संवर्धन हा देशाचा खजिना असल्याचे सांगून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. चीनसोबत डेटा शेअरिंग आणि जागतिक सहकार्याबाबतही चर्चा सुरू आहे. ब्रॅडेन चाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा म्हणणं आहे की, ही प्रक्रिया नैसर्गिक आहे आणि पृथ्वीच्या दीर्घकालीन भूगर्भीय चक्राचा भाग आहे. तथापि, सतर्कता आणि योग्य पूर्वतयारी नसेल तर जीवनासाठी गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. शास्त्रज्ञांचा सल्ला आहे: भूकंप-प्रतिरोधक इमारती बांधा, नद्या आणि हिमनद्यांचे निरीक्षण सतत करा, आणि आपत्कालीन योजना तयार ठेवा.