पारा घसरला; कडाक्याच्या थंडीचा यलो अलर्ट कायम

12 Nov 2025 21:53:43
नागपूर, 
yellow-cold-alert : उत्तर भारतात जोरदार थंडीची लाट आल्यानंतर मध्यवर्ती नागपूर शहर गारठले आहे. बुधवारी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद नागपुरात झाली तर गोंदिया १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
 
 
cold
 
 
 
उत्तर भारताकडील थंडीच्या लाटेचा परिणाम नागपूरसह विदर्भात दिसून येत आहे. संपूर्ण विदर्भात थंडीचा ’यलो अलर्ट’ दिल्यामुळे हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारच्या तुलनेत नागपूरच्या तापमानात अंशतः वाढ झाली, मात्र थंडीचा कडाका कायम आहे. केरळच्या किनार्‍यालगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार स्थिती आहे. नागपुरात पहाटे थंडीचा कडाका जाणवत आहे. सकाळी थंडी तर दुपारी चटके आणि उकाडा अशी परस्पर विरोधी स्थिती पाहायला मिळत आहे.
 
 
किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. १९१२ मध्ये नागपूरचा पारा ६.७ अंशांवर गेला होता.
 
 
महिन्यातील जुना इतिहास बघितल्यास, वैदर्भीयांना नेहमीच कडाक्याच्या थंडीला सामोरे जावे लागले आहे. २०१६ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी किमान तापमान ९.८ अंशांपर्यंत घसरले होते. याशिवाय १९४६ मध्ये महिनाभरात १६२ मिमी पाऊसही नागपूरकरांनी अनुभवला आहे.
 
सोमवारी शहराचे किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. थंडी वाढल्याने अनेकांनी स्वेटर, जॅकेट, ब्लॅकेट आणि बाहेर काढल्या आहेत. पारा सातत्याने खाली येत असल्याने नोव्हेंबरमध्ये ५५ वर्षांपूर्वीच्या सर्वात कमी तापमानाचा विक्रम मोडित निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज वर्तविला असून हवामान स्वच्छ होताच थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे.
Powered By Sangraha 9.0