विद्यापीठावर अभाविपचा धडक मोर्चा

13 Nov 2025 19:56:46
नागपूर, 
abvps-protest-march : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रवेश, परीक्षांचे निकाल, शुल्क, पाठ्यक्रम, पदभरती आणि छात्रसंघ निवडणुका यांसारख्या विविध शैक्षणिक समस्यांवर उपाययोजना व्हाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) आज विद्यापीठावर मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढला. विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले.
 
 

abvp  
 
 
 
 
नागपूर विद्यापीठात अनेक प्रशासकीय गोंधळ आहे. या गोंधळातील अनेक मुद्यांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. नागपूर विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत दांदळे यानी प्रवेश, परीक्षा आणि निकाल यासंबंधित समस्या सर्वांसमोर सादर केल्या. गोंदिया विद्यार्थी प्रतिनिधी मौसम पटले यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील त्रुटींबद्दल विद्यापीठ प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विद्यापीठाने सुरू केलेले पोर्टल आणि सुविधा केंद्रच असुविधा निर्माण करत असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रवीण सदहुले यांनी सांगितले. तसेच विविध अभ्यासक्रमांचे शुल्क ठरविताना पारदर्शकता असावी, प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच सर्व सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्याची मागणी केली.
 
 
 
भंडारा येथील विद्यार्थी प्रतिनिधी प्रणाली गोमासे हिने विद्यापीठातील प्रयोगशाळा व ग्रंथालयाची दुरवस्था अधोरेखित केली. सीसीटीव्ही, स्मार्ट क्लासरूम आणि विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी असलेले सॅनिटरी पॅड मशीन केवळ नावापुरती असून प्रत्यक्षात त्यांचा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थी प्रतिनिधी हर्ष हरडे यांनी विद्यापीठात प्रवेशापासूनच विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. वसतिगृहांची दयनीय अवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडताना प्रवेश प्रक्रियेत एजंट व ब्रोकरचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, परीक्षा व पुनर्मूल्यांकनाचे निकाल 45 दिवसांच्या आत जाहीर करणे तसेच, निकालात तफावत आढळल्यास संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी केली. परीक्षा काळात शिक्षक दोन ते तीन महिने अध्यापनापासून दूर राहतात, त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील नियुक्ती 15 दिवसांच्या कालावधीत फेरबदलून देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या छात्रसंघ निवडणुका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्या तातडीने घेण्यात याव्यात अशी मागणी एबीव्हीपी तर्फे करण्यात आली आहे. या मोर्चात एनईपी अंमलबजावणी, छात्रसंघ निवडणुका आणि विद्यार्थी हक्कांवरील विविध विषयांवर चर्चा झाली. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
 
व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेमही विद्यार्थ्यांचा पाठीशी उभा आहे. आज विद्यापीठाच्या वतीने उपस्थित कुलसचीव राजू हिवसे यांच्यासमोर लिखित स्वरूपात विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित 36 मागण्या सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हा मोर्चा संपणार नाही. जोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही एबीव्हीपी स्वस्थ बसणार नाही.
- विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके
 
 
या सर्व मागण्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या समोर ठेवून यावर चर्चा केली जाईल. तसेच या सर्व रास्त मागण्या लवकरात लवकर निराकरण करू आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मी आज सर्व विद्यार्थ्यांसमोर देतो. विद्यापीठ स्तरीय समस्या तर आम्ही सोडवूच आणि शासकीय स्तरावरील प्रलंबित मागण्यांचा पाठपुरवठा देखील आम्ही घेऊ.
- कुलसचीव राजू हिवसे
Powered By Sangraha 9.0