अल-फलाह विद्यापीठाची चौकशी...केंद्राचे आदेश

13 Nov 2025 14:39:08
नवी दिल्ली,
देशाला हादरवून टाकणाऱ्या लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ या संस्थेभोवती संशयाचे सावट आणखी गडद झाले आहे. या विद्यापीठाशी संबंधित डॉक्टरांना अटक झाल्यानंतर केंद्र सरकारने विद्यापीठाच्या आर्थिक स्रोतांवर आणि निधीच्या वापरावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
al falah university
 
एका माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाला (ED) अल-फलाह विद्यापीठाला मिळालेल्या निधीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांमध्ये या विद्यापीठाचा थेट दुवा असल्याचे तपास यंत्रणांनी उघड केले आहे. असा आरोप आहे की लाल किल्ला परिसरातील स्फोटाचा कट याच संस्थेत रचण्यात आला होता. तपासात उघड झाल्यानुसार, या विद्यापीठातील किमान चार डॉक्टरांनी दहशतवादी कटासाठी २६ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती. ही रक्कम स्फोटक साहित्य आणि संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी वापरली गेली होती. डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. अदील अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि डॉ. उमर नबी या चौघांनी मिळून ही रक्कम उभारली आणि ती डॉ. उमर नबी यांच्या ताब्यात ठेवण्यात आली.
 
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आणि अल-फलाह विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असलेले डॉ. उमर नबीच सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या हुंडई आय-२० कारचे चालक असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारमध्ये अमोनियम नायट्रेटसह अत्यंत ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात आला होता. स्फोटानंतर दिल्ली पोलिस आणि एनएसजी पथके घटनास्थळी दाखल झाली होती.  एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात वापरलेली कार डॉ. उमर नबी यांच्या नावावर नोंदणीकृत होती. तपासादरम्यान फरीदाबादमधून डॉ. उमर नबी, डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून २,९०० किलो स्फोटके, शस्त्रे आणि कोडेड डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती आणि दहशतवादी नेटवर्कच्या संपर्कांचे पुरावे सापडले आहेत.
 
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या निधीतून संशयितांनी गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या भागातून सुमारे २६ क्विंटल एनपीके खत खरेदी केले. हे खत इतर रसायनांमध्ये मिसळून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस (IEDs) तयार करण्यासाठी वापरले जाते. या खरेदीच्या व्यवहारानेच तपासाला निर्णायक वळण मिळाले. तसेच स्फोटाच्या काही दिवस आधी उमर आणि मुझम्मिल यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
 
या दहशतवादी मॉड्यूलचा संबंध जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कार्यरत नेटवर्कशी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. शिवाय, विद्यापीठाचे पाकिस्तान समर्थित जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांशी आर्थिक किंवा संपर्काचे धागेदोरे असू शकतात, असेही संकेत मिळत आहेत. दरम्यान, अल-फलाह विद्यापीठाला मान्यता खोटी दाखवल्याबद्दल राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.त्यांनी आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की हे विद्यापीठ ना मान्यताप्राप्त आहे, ना मान्यतेसाठी अर्ज केलेला आहे, तरीही त्यांच्या वेबसाइटवर खोटी माहिती दिली गेली आहे. विद्यापीठाने “NAAC ग्रेड A मान्यता” असल्याचे जनतेला भ्रामकपणे दाखवले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिशाभूल झाली. या सर्व प्रकरणांमुळे आता अल-फलाह विद्यापीठावर गंभीर संशय निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, ईडी, एनआयए आणि दिल्ली पोलिस या तिन्ही संस्था मिळून या कटकारस्थानाचा मूळ शोध घेण्यासाठी तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0