धोका दारात आणि घरातही...

13 Nov 2025 09:24:06
 
अग्रलेख
delhi blast देशाच्या आत्म्याचे, सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या दिल्लीतील अगदी वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी उभ्या कारमध्ये स्फोट झाला, नव्हे तो घडवून आणला गेला. गेल्या काही दिवसांच्या वर्तमानपत्रांची मुखपृष्ठ बघितली तर देशात ठिकठिकाणी लहान मोठ्या आतंकी घटना घडताना दिसत आहेत. दिल्लीतल्या कार स्फोटाच्या बातमीने तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेत व्हाईट कॉलर्ड प्रोफेशनल्स म्हणून गणल्या जाणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येणे आणि स्फोटाची घटना थेट दहशतवादी संघटनेशी जोडली जाणे, ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशी धोक्याची घंटा आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करेल यात शंका नाही. पण भारतासारख्या खंडप्राय देशात ठिकठिकाणी अशा दहशतवादाचा वाढता धोका पाहता, केवळ आणि केवळ सरकारी यंत्रणांच्या भरवशावर राहणे पुरेसे नाही. प्रत्येक नागरिकाची सावधगिरी, सतर्कता आणि जबाबदारी यातूनच दहशतवादाविरोधी लढ्याचा प्रभाव वाढविता येईल.
 
 

दिल्ली ब्लास्ट  
 
 
एक काळ होता, जेव्हा बहुतांशी दहशतवादी हल्ले सीमेपलीकडील शक्तीकडून प्रायोजित केले जायचे आणि त्यांचे स्वरूपही उघडपणे लष्करी किंवा निमलष्करी असायचे. ते तसे आता राहिलेले नाही, असेही नाही. तसे प्रकार थांबलेले नाहीत. मात्र, आता दहशतवादाने आणखी एक नवे रूप धारण केले आहे. आताचे दहशतवादी हल्ले हायब्रीड आणि लोन वुल्फ स्वरूपाचे जास्त दिसतात. दिल्लीच्या कार स्फोटातून हे स्पष्ट होते की, उच्चशिक्षित आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील असलेले लोकही कट्टरपंथी इस्लामींच्या देशविघातक विचारधारेचे बळी ठरत आहेत. आधीच्या हल्ल्यांमध्ये दहशतवादी संघटनांची थेट ओळख असायची. दहशतवादी संघटना जाहीर जबाबदारीच घ्यायच्या. दिल्लीच्या घटनेत असे दिसले की, अशा कारवायांसाठी व्हाईट कॉलर्ड व्यक्तींचा वापर होतोय. याचा अर्थ असा की, दहशतवादी संघटनांनी आपली विषाक्त मुळे खोलवर रुजवली आहे. स्लिपर सेल हा त्यातलाच एक प्रकार. दहशतवादी संघटनांचा हा गुप्त सदस्यांचा गट असतो, जो कोणत्याही देशात सामान्य नागरिकांप्रमाणे शांतपणे राहण्याचे ढोंग करतो. साधारणतः त्यांच्या आकांकडून आलेला गुप्त आदेश मिळेपर्यंत तो अजिबात सक्रिय नसतो. आपली ओळख गुप्त ठेवणे हे त्याचे वैशिष्ट्य असते. या सेलचे सदस्य कुणीही असू शकतात. दिल्लीच्या घटनेत डॉक्टर्स सापडले. त्यांच्यात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स किंवा अगदी रोजंदारी करणारा सामान्य कामगारही असू शकतो. अशा लोकांना वरकरणी ओळखणे फार कठिण आहे, कारण आपले सामाजिक जीवन प्रामुख्याने परस्पर विश्वासावर चालते. स्लिपर सेलशी संबंधित लोकांचे जीवनही सामान्यांसारखेच असते. पण, संधी मिळाली तर ते किती भयंकर घडवू शकतात, हे दिल्लीत दिसले आणि त्या व आधीच्या घटनांच्या चौकशीदरम्यान स्फोटके तयार व गोळा करण्याच्या कामातील उच्चशिक्षितांच्या सहभागातही दिसले.delhi blast असे लोक एरवी कोणत्याही संशयास्पद कृतीपासून दूर राहतात. बहुतांश वेळा त्यांना ऑनलाईन माध्यमातून किंवा स्थानिक गुप्त समन्वयकांच्या मार्फतच प्रशिक्षण दिले जाते. आयडी बॉम्ब बनवण्याचे साहित्य, गुप्त संवाद साधण्याचे मार्ग आणि कारवायांची योजना त्यांना गोपनीय पध्दतीनेच पोहोचविली जाते. योग्य वेळ, ठिकाण आणि संघटनेकडून हिरवी झेंडी मिळाल्याबरोबर हा स्लिपर सेल सक्रिय होतो. गुप्त माहिती गोळा करणे, घातपात करणे, बॉम्बस्फोट घडवणे किंवा दहशतवादी हल्ल्यासाठी लॉजिस्टिक पुरवठा करणे आदी त्यांचे काम असते. हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात असल्याने त्यांचा शोध घेणे तपास यंत्रणांसाठी वाटते तेवढे सोपे नाही. अटक होईपर्यंत त्यांचा साधा संशयही येत नाही. मात्र, तोपर्यंत मोठा घातपात घडलेला असतो आणि म्हणून सर्वसामान्य जनतेची सावधगिरी यापुढच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या आसपासच्या, भोवतालच्या लोकांकडून देशविरोधी, समाजविघातक कारवाया होत असल्याचा साधा संशय जरी आला तरी ते तातडीने सुरक्षा यंत्रणांचा लक्षात आणून देणे ही एक प्रकारे देशभक्तीच आहे, असे समजून आपण काम केले पाहिजे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2004 ते 2014 या काळात देशात 7,217 दहशतवादी हल्ले झाले, तर 2014 ते 2024 दरम्यान हा आकडा 2,242 पर्यंत खाली आला, जो सरकारी सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांचे यश दर्शविणारा आहे. तरीही, 2024 मध्ये 85 हून अधिक दहशतवादी हल्ले झालेत आणि त्यांत 26 नागरिकांना आणि 31 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हे आकडे असे सांगतात की, धोका कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. उलट अशा हल्ल्यांचे स्वरूप अधिक कपटी आणि पाताळयंत्री झालेले आहे. दहशतवाद्यांचे लक्ष्य आता केवळ लष्करी तळ किवा महत्त्वाची सरकारी ठिकाणे नाहीत. ती तर त्यांच्या हिटलिस्टवर आहेतच. परंतु, आता लोकांची वर्दळ असलेली सार्वजनिक ठिकाणे हे त्यांचे लक्ष्य आहे. सामान्यांना लक्ष्य करणे व त्यातून व्यापक दहशत निर्माण करणे ही या दहशतवादी संघटनांची नवी रणनीती आहे. भारताचे लष्कर, सुरक्षा यंत्रणा जेवढ्या अधिक सक्षम होतील, तेवढी या दहशतवादी संघटनांची ही धूर्त रणनीती वाढत जाईल. या भ्याड संघटना भारतीय जवानांसमोर टिकूच शकत नाहीत, याची पुरेपूर कल्पना त्यांनाही आहे.
2006 मध्ये झालेले मुंबई बॉम्बस्फोट आठवा. लोकल ट्रेनमध्ये अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या स्फोटांच्या मालिकेत 209 निरपराध माणसं ठार झाली होती. किंवा 2008 च्या 26/11 ला झालेला मुंबई हल्ला आठवा. त्यात हॉटेल, रेल्वे स्थानक आणि रुग्णालयांसारख्या ठिकाणांना लक्ष्य केले गेले आणि 171 लोक मारले गेले. त्याच वर्षी जयपूर आणि 2010 मध्ये पुण्याच्या बाजारपेठेत झालेले स्फोटही त्याच धर्तीचे. हे सारे हल्ले हेच स्पष्ट करतात की, धोका केवळ सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता आपल्या घराच्या दारावर उभा आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे तो अगदी घरातही शिरू लागला आहे. पाणीपुरवठ्यातून, तुमच्या घरी होणाऱ्या इंधन पुरवठ्यातून किंवा खाद्य पुरवठ्यातूनही तो तुमच्या-आमच्या घरात येऊ शकतो. आपल्या उत्सवांतून, यात्रेतून, मॉल्समधून किंवा मग शाळेतूनही तो आपल्या आयुष्याची राखरांगोळी करू शकतो. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा चौकस आहेतच. पण, एवढ्या विशालकाय देशात सामान्यांची जागरूकता तेवढीच महत्त्वाची आहे.
प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत जागरूक राहणे काळाची गरज आहे. अपरिचित व संशयास्पद वस्तूंबाबत सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सूचना देणे, आपल्या भागात किंवा सोसायटीमध्ये अचानक आलेल्या अनोळखी व्यक्ती, त्यांची असामान्य हालचाल किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास त्याची नोंद घेणे आणि पोलिसांना तातडीने कळविणे हेही देशाच्या सीमेवर सतर्क राहणाऱ्या सैनिकासारखीच देशाची सेवा आहे, हे आम्ही जाणले पाहिजे. ज्याप्रमाणे कोविड महामारीत प्रत्येक नागरिकाने मास्क घालून आणि नियम पाळून आपले योगदान दिले, त्याचप्रमाणे दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यातही अत्यंत सावध राहणे मोलाचे आहे. दिल्लीतील दहशतवादी घटना वा मुंबईवरचा हल्ला असो, प्रत्येकच घटनेने हे सिद्ध केले आहे की, दहशतवादाचा धोका ही छुपी आग आहे. ती केव्हाही होत्याचे नव्हते करू शकते. अशा घटनांना सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.delhi blast सामान्य नागरिकांनी दाखवलेली जागरूकता अनेक हल्ले घडण्यापूर्वीच थांबवू शकते. आपली सतर्कता हेच आपल्या कुटुंबाचे, देशाचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. देशविरोधी, विघातक शक्तींना सळो की पळो करून सोडा, आम्ही सरकार सोबत आहोत, असे सांगणेही गरजेचे आहे. हा संदेश प्रत्येक लोकशाहीवादी देशासाठी महत्त्वाचा आहे. जन सहभाग आणि जन सहयोग हाच दहशतवादाचा अंत करण्यासाठीचा प्रभावी मंत्र आहे, हे समजून घेतले पाहिजे. रात्रच नव्हे तर सध्याचा अख्खा काळच वैऱ्याचा आहे, याची खूणगाठ बांधली पाहिजे.
Powered By Sangraha 9.0