स्वातंत्र्य अमृत महोत्सवातील शिक्षामाफीचा लाभ कैद्याला द्या

13 Nov 2025 19:45:03
नागपूर, 
Freedom Amrit Festival : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने जारी केलेल्या शिक्षामाफीच्या परिपत्रकाचा लाभ नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यालाही मिळावा, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत कारागृह प्रशासनाला संबंधित कैद्याला माफीचा लाभ देण्याचे निर्देश दिले. ही याचिका अजय खुमान चिंचखेडे (वय ३७, रा. कमाल चौक, शनिचरा) या कैद्याने दाखल केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने चिंचखेडेला भादंवि कलम ३०७, ३६४, ३८७ आणि ३४ अंतर्गत दोषी ठरवत आठ वर्षांची शिक्षा सुनावली होती, तर ३४६ (अ), ३२४, आर्म्स अ‍ॅक्ट कलम २५ आणि मोक्का अंतर्गत त्याला निर्दोष मुक्त केले होते.
 
 
 
ngp
 
 
दरम्यान, राज्य शासनाने १३ मार्च २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षाबंदी कैद्यांना ‘राज्य माफी’ देण्याचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार चिंचखेडेने देखील शिक्षामाफीचा लाभ देण्याची विनंती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे केली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने परिपत्रकाची अंमलबजावणी त्याच्यावर लागू होत नसल्याचे सांगत नकार दिला. त्यांचा युक्तिवाद असा होता की चिंचखेडेला २५ डिसेंबर २०२४ रोजी शिक्षा सुनावली गेली असून, परिपत्रक त्याआधी म्हणजे मार्च २०२४ मध्येच जारी झाले होते. या निर्णयाविरोधात कैद्याने अ‍ॅड. राजू कडू यांच्या माध्यमातून हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल केली. त्यांनी नमूद केले की चिंचखेडे ७ ऑगस्ट २०१८ पासून तुरुंगात आहे आणि न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यात उशीर झाला असला तरी त्याबाबत कैदी जबाबदार नाही.
 
यापूर्वीही न्यायालयाने अशा स्वरूपाच्या परिपत्रकांचा लाभ कच्चे कैदी (अंडर ट्रायल) असतानाही दिला आहे, असा दाखला त्यांनी दिला. राज्य शासनातर्फे अ‍ॅड. सागर अशीरगडे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की, शिक्षा ठोठावण्यात झालेला विलंब कैद्याच्या नियंत्रणाबाहेरचा असून, अशा परिस्थितीत शासनाच्या परिपत्रकाचा लाभ नाकारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हायकोर्टाने नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला कैदी अजय चिंचखेडे याला स्वातंत्र्य अमृत महोत्सवातील शिक्षामाफीचा लाभ तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0