कारंजा लाड,
Gold chain snatched शहरातील वाणीपुरा भागात वास्तव्यास असलेल्या व्यापार्याची एका तरुणाने गल्लीत गाडी अडवून मारहाण करत गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर शहर पोलिसांनी दाखल फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. र, जयेश बकीमचंद्र लोढाया हे तिरुमला जिनिंग प्रेस कोळी येथे व्यवसाय पाहतात. ११ नोव्हेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे दिवसभर काम करून रात्री ९ वाजता त्यांच्या हुंडाई आय २० कारने घरी परतत असताना फुलारी गल्ली परिसरात आल्यानंतर नावेद खान अनिस खान रा. भारतीपुरा, कारंजा हा आपल्या गाडीने आला आणि लोढाया यांच्या गाडीसमोर थांबला.
नावेद खानने कोणतेही कारण न सांगता लोढाया यांच्या कारच्या काचेला बुक्की मारली. त्यावर लोढाया यांनी काच खाली करून काय झाले? असा प्रश्न विचारला असता, नावेदने अचानक त्यांच्या चेहर्यावर बुक्की मारत गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी किंमत अंदाजे किंमत १.६० लाख जबरदस्तीने हिसकावून घेतली व पसार झाला. यावेळी पीडित व्यापार्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता, परिसरातील नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी लोढाया यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी लोढाया यांनी कारंजा शहर पोलिस ठाण्यात येऊन सविस्तर जबानी रिपोर्ट दिला. त्यानुसार कारंजा शहर पोलिसांनी आरोपी नावेद खान अनिस खान विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (४), १२६ (२), ११५ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक वसंत ठाकरे करत आहेत.