महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये कामाची परवानगी; योगी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

13 Nov 2025 13:09:09
लखनऊ,
Historic decision of Yogi government उत्तर प्रदेशातील महिलांसाठी योगी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करण्याची परवानगी मिळणार आहे. कामगार महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क पथकाने जारी केलेल्या निवेदनानुसार, महिलांच्या सुरक्षेसाठी घरापासून ते कार्यस्थळापर्यंत प्रत्येक स्तरावर कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
 
Historic decision of Yogi government
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘उत्तर प्रदेश कारखाना सुधारणा विधेयका’ला मंजुरी दिल्यानंतर सरकारने हा निर्णय अधिकृतपणे लागू केला आहे. नवीन तरतुदीनुसार, महिला आता आपली लेखी संमती दिल्यानंतर संध्याकाळी ७ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत काम करू शकतील. ही संमती राज्याच्या कामगार विभागाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत. कारखान्यांमध्ये सुरक्षा, आरोग्य व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही देखरेख, महिला सुरक्षा रक्षकांची तैनाती आणि सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाईल. या निर्णयामुळे महिलांना त्यांच्या इच्छेनुसार सलग सहा तास ब्रेकशिवाय काम करण्याची परवानगी मिळणार आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हक्कांसाठीही सरकारने सकारात्मक बदल केले आहेत. महिलांसाठी ओव्हरटाईमची मर्यादा दर तिमाहीत ७५ तासांवरून वाढवून १४४ तास करण्यात आली आहे, आणि या ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देण्यात येईल. याशिवाय महिलांसाठी कारखाने आणि धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्याचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. पूर्वी महिला केवळ १२ धोकादायक उद्योगांमध्येच काम करू शकत होत्या, मात्र आता त्यांना सर्व २९ धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्याची मुभा मिळाली आहे. या निर्णयामुळे महिलांना आपले कौशल्य विकसित करण्याची आणि नव्या क्षेत्रांमध्ये आत्मविश्वासाने काम करण्याची संधी मिळणार आहे. औद्योगिक विस्तार, तांत्रिक प्रगती आणि रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन योगी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या पावलामुळे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0