मुंबई,
Indurikar Maharaj निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांचे भक्त आणि समाजप्रभोधनकार म्हणून खूप आदर असलेले व्यक्तिमत्त्व या वेळेस सोशल मीडियावर आणि वारकरी संप्रदायाकडून टीकेच्या केंद्रस्थानी आले आहे.
महाराजांची लेक ज्ञानेश्वरी यांचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने पार पडला. जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाही थाट बघायला मिळाला. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भव्य गाड्यांच्या ताफ्यासह मंगल कार्यालयात पोहोचली. तिच्या आगमनाचे दृश्य, शाही कपडे आणि गाड्यांचा थाट सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या फोटो आणि व्हिडीओंनंतर अनेकांनी इंदुरीकर महाराजांवर टीका केली. किर्तनात साधेपण आणि साध्या जीवनाचा उपदेश देणारे महाराज या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले, ज्यामुळे भक्तांमध्ये आणि समाजामध्ये चर्चेला सुरुवात झाली.सततच्या टीकेमुळे महाराजांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, “आम्ही संसार कसा केला हे लोकांना माहिती नाही. किती कष्ट करून इथपर्यंत पोहोचलो, याचा विचार लोक करत नाहीत. माझ्या मुलीला आणि मुलाला यात काही दोष नाही. माझ्या घरापर्यंत टीका पोहोचली आहे, आणि हे अजिबात ठीक नाही.”महाराजांनी पुढे सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी टीका सहन केली आहे, परंतु आता विषय त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी गंभीर निर्णय घेण्याचा विचार केला आहे. महाराजांनी थेट संकेत दिले आहेत की, लवकरच ते किर्तन सेवा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यांनी सांगितले की, पुढील तीन ते चार दिवसांत ते एक व्हिडीओद्वारे आपले विचार आणि स्पष्टीकरण समाजासमोर ठेवणार आहेत.या घटनाक्रमामुळे धार्मिक आणि समाजप्रभोधन क्षेत्रात चर्चेला वेग आला असून, भविष्यात महाराजांच्या किर्तन कार्यक्रमांवर वादाचे सावट पडू शकते.