वाशीम,
Leprosy search campaign in the district कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत वाशीम जिल्ह्यात१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने हे अभियान प्रभावीपणे राबवावे. कुष्ठरुग्णांच्या शोधासाठी आपल्या घरी येणार्या पथकास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी यावेळी केले. कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात जि.प.येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल काळे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. महेश चाफे, डॉ. निरज शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित औषधोपचार देणे, संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण कमी करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे आदी कुष्ठरुग्ण शोध अभियानाचे प्रमुख उद्देश आहेत. वाशीम जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोधासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने आशासेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे. घरोघरी जाऊन या टीम सर्वेक्षण करणार आहे.असे डॉ.शिंदे यांनी सांगितले.
मुकाअ चौहान पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. प्राधान्याने सोशल मिडियाचा वापर करावी. ग्रामसभेत अभियानाबाबत माहिती द्यावी. शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळेस विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, जेणेकरुन हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल व सर्वेक्षणास गती मिळेल. बैठकीला आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. शासनाच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. त्वचेवर डाग, मुंग्या येणे, संवेदना कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास तपासणी अवश्य करा. या कुष्ठरोग शोध मोहिमेचा लाभ घ्या आणि कुष्ठमुक्त महाराष्ट्रासाठी आपला सहभाग नोंदवा!
डॉ. निरज शिंदे, सहायक संचालक, आरोग्य सेवा