gondwana-university गोंडवाना विद्यापीठात अनेक बाह्य कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करतात. त्यांची नियुक्ती करणारे कंत्राटदार त्या कर्मचार्यांचा हक्क मारत असल्याची गंभीर तक्रार गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झाली आहे. खरे तर, विद्यापीठाकडून या कंपनीला प्रति कर्मचारी (लिपिककरिता) 24 हजार रुपये मोबदला दिला जातो. परंतु, कंपनी कर्मचार्याला त्यातील केवळ 12 हजार रूपये देते आणि 18 हजार रुपयांवर त्यांची स्वाक्षरी घेते! याबाबत कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, आम्हाला विद्यापीठाच्या शीर्षस्थ अधिकार्यांना पैसे द्यावे लागतात, असे धक्कादायक उत्तर मिळाल्याचे शेखर देशपांडे यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे!!
या गंभीर तक्रारीची दखल घेत, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. नवोपक्र, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार हे या चौकशी समितीचे सदस्य आहेत. या समितीने त्यांचा चौकशी अहवाल कुलगुरू डॉ. बोकारे यांच्याकडे सादरही केला आहे.
गोंडवाना विद्यापीठात बाह्य कर्मचार्यांची नियुक्ती ज्या कंपनीने केली आहे. gondwana-university त्यांच्याकडून कर्मचार्यांची आर्थिक पिळवणूक होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून या कर्मचार्यांना न्याय मिळवून द्यावा व विद्यापीठाच्या ज्या शीर्षस्थ अधिकार्याला कंत्राटदार पैसे पुरवत आहे त्यांचीही चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीवजा तक्रार 12 जून 2025 रोजी शेखर देशपांडे यांनी दिली होती.
गोंडवाना विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने सुरक्षारक्षक, शिपाई, लिपिक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ या कंपनीला प्रति कर्मचारी 24 हजार रुपये देते. परंतु, या कर्मचार्यांची केवळ 12 हजार रुपयांवर बोळवण करून, 18 हजारावर त्यांची स्वाक्षरी घेतली जाते. या कर्मचार्यांना कामाची नितांत आवश्यक्ता असल्याने ते प्रत्यक्ष तक्रार करायला धजावत नाहीत. त्यातील, एका कर्मचार्याने कंत्राटदाराला विचारण्याचे धाडस केले. ‘‘तुम्ही आमची 18 हजार रुपयांवर स्वाक्ष्री घेऊन आम्हाला फक्त 12 हजार रुपये का देता’’! तेव्हा,‘‘आम्हालासुद्धा प्रत्येक महिन्याला विद्यापीठाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना पैसे द्यावे लागते.’’, असे धक्कादायक उत्तर मिळाल्याचे शेखर देशपांडे यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.