शिर्डी,
Miracles or superstitions in Shirdi श्रद्धा आणि विज्ञान यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. उत्तराखंडमधील एका कुटुंबाने शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अंध मुलाला अचानक दृष्टी मिळाल्याचा दावा केला असून, या कथित “चमत्काराचा” व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र आक्षेप घेत तो फेटाळून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील हे कुटुंब काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांच्या मुलाला जन्मापासूनच एका डोळ्याने दिसत नव्हते. दर्शनादरम्यान मुलाने साईबाबांच्या मूर्तीकडे पाहिले असता अचानक प्रकाश पडल्यासारख झाले आणि त्या क्षणानंतर त्याला त्या डोळ्याने दिसू लागल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. या अनुभवाचे वर्णन करत मुलाने सांगितले, “माझ्या डोळ्यावर प्रकाश पडला, मी थोडा घाबरलो. पण मला काहीच दिसत नव्हत. साईबाबांच्या दर्शनानंतर अचानक डोळ्यात प्रकाश आला आणि आता मला सर्वकाही दिसत आहे असे तो म्हणाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भक्तांमध्ये कौतुक आणि आश्चर्याची लाट उसळली. अनेकांनी याला साईबाबांचा चमत्कार म्हटले. मात्र, अंनिसने या दाव्याला अंधश्रद्धा ठरवत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, श्रद्धेचा आम्ही सन्मान करतो, पण दृष्टी आल्याचा हा दावा निखळ अंधश्रद्धा आहे. साईबाबा मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर नेत्ररुग्णालय आहे. तिथे डोळ्यांचे ऑपरेशन आणि प्रत्यारोपण करून रुग्णांना प्रत्यक्ष वैद्यकीय उपचाराने दृष्टी दिली जाते. जर खरोखरच साईबाबांच्या चमत्काराने दृष्टी येत असेल, तर रुग्णालयांना बंद करावे आणि सर्व रुग्णांना थेट मंदिरात पाठवावे.
इतकंच नव्हे, तर अंनिसने साईबाबा संस्थानालाच थेट आव्हान दिल आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटल आहे, “जर साईबाबांच्या चमत्काराने अंध व्यक्तींना दृष्टी मिळत असेल, तर आम्ही पाच अंध भक्तांना घेऊन येऊ. त्यांच्या डोळ्यांना साईबाबांच्या कृपेने दृष्टी मिळवून दाखवा. असं झालं, तर आम्ही साईबाबा संस्थानाला २१ लाख रुपयांचं पारितोषिक देऊ आणि आमची चळवळ कायमची बंद करू. या दाव्यामुळे शिर्डीत भक्तांमध्ये चर्चेला उधाण आलं असून श्रद्धा आणि विज्ञान यांच्या सीमारेषेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एकीकडे भक्तांचा साईबाबांवरील विश्वास अधिक दृढ होत असताना, दुसरीकडे अंनिसने या प्रकरणाकडे तर्क आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचं आवाहन केलं आहे.